

वैजापूर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सोमवारी अधिक जोमाने पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगर परिषद कार्यालयात सकाळपासूनच उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत होती. अखेरच्या दिवशी तब्बल ७० उमेदवारांनी आपले अर्ज सादर केल्यामुळे २५ जागांसाठी एकूण इच्छुकांची संख्या थेट २१० वर पोहोचली. यंदा निवडणुकीची लढत अधिक रंगणार असल्याचे या गर्दीवरून स्पष्ट झाले.
नगराध्यक्ष पदासाठीही मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसली. सोमवारी शिल्पा दिनेश परदेशी (भाजप), सुभाष गायकवाड (काँग्रेस) आणि श्यामराव गभाजी गायकवाड (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले. यापूर्वी डॉ. दिनेश परदेशी (भाजप), संजय बोरनारे (शिवसेना – शिंदे गट) आणि दशरथ बनकर (अपक्ष–भाजप समर्थक) यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आता एकूण सहा उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत.
अंतिम दिवशी उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे नगर परिषद कार्यालय परिसरात दिवसभर उत्साहवर्धक वातावरण होते. प्रत्येक पक्षाच्या झेंड्यांनी, घोषणांनी आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीने संपूर्ण परिसर गजबजला होता.
सर्व दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे. उमेदवारांना २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होईल. यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भाजपाने यावेळी शिवसेनेशी युती न करता सरळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी दिलेल्या माहितीनुसार,
भाजप १९ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस ६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
त्यामुळे महायुतीची ताकद वाढून वैजापूर नगरपरिषद भाजप–राष्ट्रवादीच्या ताब्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
शिवसेना (शिंदे गट)नेही या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी केली असून नगराध्यक्ष पदासाठी संजय बोरनारे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने नगरसेवकपदासाठी 25 अर्ज दाखल केल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काही जागांवर अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारणात त्रिकोणी लढतीचे जोरदार चित्र दिसू लागले आहे.
महायुती (भाजप–राष्ट्रवादी), शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी अशा तीन वेगळ्या आघाड्या तयार झाल्याने या निवडणुकीत सरळ त्रिकोणी संघर्ष होणार आहे. निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांचे पक्षांतर, संभाव्य युती-विना-युतीचे निर्णय, उमेदवारांची संख्या आणि स्थानिक पातळीवरील मतदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे ही निवडणूक अधिक रंजक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वैजापूर नगरपरिषद निवडणूक सामान्यतः अत्यंत चुरशीची असते, पण यावर्षी उमेदवारांच्या गर्दीमुळे आणि पक्षीय गणितांमुळे ही निवडणूक आणखीच तापलेली आहे. शहरातील नागरिकांमध्येही निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता असून, कोणत्या पक्षाला किती जागा आणि कोणाचा नगराध्यक्ष होणार हे पाहणे खरोखरच उत्सुकतेचे ठरणार आहे.