Fraud file photo
छत्रपती संभाजीनगर

Bogus Students : बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले

संचमान्यतेतील शिक्षकांची पदे टिकवून ठेवण्यासाठी आणि शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी चिकलठाणा परिसरातील ख्वाजा उर्दू शाळेने चक्क बोगस विद्यार्थ्यांचा पट दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Embezzled grants by showing bogus students

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संचमान्यतेतील शिक्षकांची पदे टिकवून ठेवण्यासाठी आणि शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी चिकलठाणा परिसरातील ख्वाजा उर्दू शाळेने चक्क बोगस विद्यार्थ्यांचा पट दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत प्रवेशच नसलेल्या त्रयस्थ व्यक्तींचे आधार कार्ड ऑनलाईन स्टुडंट पोर्टलवर नोंदवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, चिकलठाणा येथील ख्वाजा उर्दू प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिक्षण अधीक्षक (प्राथमिक, जि.प.) सचिन शिंदे (४२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदीप गवळी (३०, रा. मुकुंदवाडी) यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात तक्रार दिली होती. पुष्पक गार्डन, चिकलठाणा येथील ख्वाजा उर्दू प्राथमिक शाळेने बनावट आधार कार्ड वापरून विद्यार्थी संख्या वाढवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या गंभीर तक्रारीनंतर शिक्षण विभागाने तातडीने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून शाळेची सखोल चौकशी केली.

या समितीने शाळेला प्रत्यक्ष भेट दिली असता, शाळेच्या रेकॉर्डवर तब्बल ४९४ विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या दाखवण्यात आली होती. मात्र, चौकशी समितीच्या भेटीदरम्यान वर्गात प्रत्यक्षात केवळ ६४ विद्यार्थीच उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

त्रयस्थांच्या आधार कार्डाचा वापर

चौकशीत असे निष्पन्न झाले की, शाळेच्या व्यवस्थापनाने आणि मुख्याध्यापकांनी संगनमत करून १५ जून २०२३ ते १५ जून २०२५ या कालावधीत शासनाची मोठी फसवणूक केली. शाळेत प्रवेशच नसलेल्या त्रयस्थ व्यक्तींचे आधार कार्ड वापरून त्यांची नोंद ऑनलाईन स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी म्हणून करण्यात आली. केवळ शाळेची मंजूर पदे टिकवून ठेवण्यासाठी आणि नियमबाह्यरीत्या सरकारी अनुदान मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आला होता.

शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

या गंभीर गैरव्यवहारानंतर, शिक्षण विभागाने १२ मार्च २०२५ रोजी या शाळेची शासन मान्यताच रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर पुढील कार्यवाहीसाठी प्रलंबित आहे. दरम्यान, शासनाची उघडपणे फसवणूक केल्याप्रकरणी आता थेट गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पचलोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT