स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड file photo
छत्रपती संभाजीनगर

स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड

वानखेडे, मकरिये, खैरे, भुईगळ यांच्या नावांचा समावेश; पाच विषय समितींसाठी ४५ सदस्य निश्चित

पुढारी वृत्तसेवा

Election of 16 members of the Standing Committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. भाजप, एमआयएम, शिवसेना, उबाठा आणि लोकविकास आघाडीच्या गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या बंद लिफाफ्यांतील नावांची घोषणा महापौर समीर राजुरकर यांनी केली. यामध्ये राजगौरव वानखेडे, अनिल मकरिये, सचिन खैरे आणि अमित भुईगळ यांच्यासह अनेक अनुभवी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच पालिकेच्या पाच प्रमुख विषय समित्यांच्या ४५ सदस्यांची नावेही जाहीर करण्यात आली.

स्थायी समिती आणि विविध पाच विषय समितींच्या सदस्य निवडीसाठी गुरुवारी महापौर समीर राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. १६ सदस्य निवडीसाठी राजकीय पक्षाच्या गटनेत्यांनी बंद लिफाफ्यामध्ये नगरसेवकांच्या नावांची यादी महापौर राजूरकर यांच्या सुपूर्द केली. महापौरांनी प्रत्येक लिफाफा उघडून त्यातील नावांची घोषणा केली.

यात भाजपकडून कमल नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना निळकंठ, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळे या नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड करण्यात आली. शिवसेनेकडून सचीन खैरे, शिंदे गटाकडून स्वेता त्रिवेदी, राजू राजपूत, लोकसेवा विकास आघाडीकडून अमीत भुईगळ, एमआयएमकडून खान अब्दुल मतीन, मेहराज खान जलील खान, पठाण मजहर पठाण अय्युब, खान अल्मास खान अमजद यांची निवड झाली.

स्थायी समिती आणि विषय समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर लगेच सर्व नवनिर्वाचित सदस्यांना महापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या जातात. परंतु महापौर समीर राजुरकर यांनी नवनिर्वाचित समितीच्या सदस्यांना पुष्पगुच्छ न देता केवळ शब्दरूपी शुभेच्छा दिल्या.

माध्यमिक पूर्व माध्यमिक शालेय समिती

मनपा माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समितीवर भाजपच्या अर्चना चौधरी, सुमित्रा म्हात्रे, दया गायकवाड, नंदलाल गवळी, उबाठाच्या सुनीता मधुकर सोनवणे, शिवसेनेकडून प्रेमलता मिलिंद दाभाडे, एमआयएमचे सय्यद उसामा अब्दुल कदीर, जिनत युनूस पटेल, मोहम्मद वसीम अहेमद यांची निवड करण्यात आली.

एमआयएम नगरसेवकांची धावपळ

महापौर राजुरकर यांनी गटनेत्यांकडून बंद लिफाफ्यामध्ये सदस्यांची नावे मागवली. परंतु एमआयएमचे गटनेते हाजी शेख हे त्यावेळापर्यंत सभागृहात आले नव्हते. तेव्हा महापौरांनी दोन मिनिटांचा वेळ दिला अन् एमआयएमच्या नगरसेवकांची एकच धावपळ झाली. अखेर विरोधी पक्षनेता समीर बिल्डर हे धावत सभागृहात दाखल झाले अन् बंद लिफाफा महापौरांना दिला.

पाकिटे द्या म्हणताच पिकला हशा

महापौर समीर राजुरकर यांनी पदभार घेताच भ्रष्टाचारमुक्तीवर भर दिला आहे. त्यात कोणी पाकीट, असा उच्चारही केला तर ते संबंधितावर संताप व्यक्त करतात. परंतु सभागृहात महापौरांनी गटनेत्यांना बंद पाकिटे तातडीने आणू द्या, असे म्हणताच एकच हशा पिकला अन् महापौरांनाही हसू आवरले नाही.

शहर सुधार समिती

शहर सुधार समितीवर भाजपचे रामेश्वर भादवे, सविता कुलकर्णी, रामदास हरणे, मयूर वंजारी, उबाठा गणेश लोखंडे, शिवसेनेचे अभिजीत जिवनवाल एमआयएमचे अली मीर वाजीद, शेख साबेर पाशू, तरन्नुम अकील अहेमद यांची निवड करण्यात आली.

महिला, बालकल्याण समिती

मनपाच्या महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपकडून पुष्पा रोजतकर, शोभा बुरांडे, ज्योती गंगवाल, सत्यभामा शिंदे, शिवसेनेच्या वतीने अनिता घोडेले, उबाठाकडून वैशाली कोरडे, एमआयएमकडून शेख नरगीस सलीम, विजयश्री जाधव, नूर जहान इक्वाल यांची निवड केली.

वैद्यकीय सहाय, आरोग्य समिती

मनपाच्या वैद्यकीय सहाय व आरोग्य समितीवर भाजपकडून पदमसिंग राजपूत, सुनीता सोळुंके, कमल थोरात, सीमा साळवे, शिवसेनेच्या यशोदा शेळके, उबाठाचे अब्दुल रशीद खान मामू हमीद खान, एमआयएमचे मतीन शेख, जोहरा समीर बिन हैदर, मोहमंद वाजेद मोहमंद अय्युब यांची निवड करण्यात आली.

समाज कल्याण समिती

मनपाच्या गलीच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण समितीसाठी भाजपकडून अशोक दामले, जालिंदर शेंडगे, अनीता साळवे, मीना खरात, शिवसेनेच्या छाया विजय वाघचौरे, उबाठाकडून सावित्रीबाई हिरालाल वाणी, एमआयएमकडून काकासाहेब काकडे, सुनीता मनोज वाहुळ, भाग्यश्री संजय साळवे यांची निवड केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT