Nitesh Rane : आय लव्ह महादेव म्हणणारा महापौर बसवा ! File Photo
छत्रपती संभाजीनगर

Nitesh Rane : आय लव्ह महादेव म्हणणारा महापौर बसवा !

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन, हिंदूंची ताकद खान मामूला दाखवा

पुढारी वृत्तसेवा

Elect a mayor who says "I love Mahadev"! Minister Nitesh Rane appeals to the voters.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी रशीद मामू यांना पक्षात प्रवेश देऊन छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. जे औरंगजेब करू शकला नाही, ते या खान मामूला करायचे आहे, असे आरोप करीत येत्या १५ जानेवारीला कमळाचे बटन दाबून महादेव म्हणणारा महापौर बसवून हिंदूंची ताकद दाखवा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रविवारी (दि.११) शहरातील सभांमध्ये केले.

यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, संजय खंबायते, उमेदवार राजू वैद्य, गोविंद केंद्रे, दया गायकवाड, सुनिता साळुंके पाटील, राहुल दांडगे आदींची उपस्थिती होती. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रभाग क्रमांक १५, १६, १७, १८, २२, २३ आणि २७ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील पद्मपुरा, गुलमंडी, पुंडलिकनगर या तीन ठिकाणी सभा झाल्या. यात बोलताना मंत्री राणे म्हणाले की मी संवाद साधण्यासाठी आलो आहे. खान मामूचा विषय गांभीर्याने घ्या. शहराकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना उभे केले जात आहे.

छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा औरंगाबाद करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. नामांतर झाल्यापासून काहींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे, असा घणाघात राणेंनी केला. अभिमानाने हिंदू म्हणून जगायचे असेल तर १५ तारखेला कमळासमोरील बटन दाबा आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. चुकून ठाकरेंची सत्ता आली तर शहर पुन्हा जुन्या नावाकडे नेले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विकास होणारच, पाण्याचा प्रश्न सुटणारच. पण हिरवे साप सत्तेत आले तर शहराचे भवितव्य धोक्यात येईल. जो कोणी औरंग्याच्या औलादी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतील, त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे म्हणत राणेंनी सभेत जोश भरला. छत्रपती संभाजीनगर महापालिकामधील महापौरच्या खुर्चीवर आय लव्ह महादेव म्हणणारा बसवायचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी खासदार भागवत कराड, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंतबायते, अनिल मकरिये, राजेश मेहता, हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, उज्ज्वला दहिफळे, छाया खोजे यांच्यासह प्रभाग १५, १६, १७ मधील उमेदवार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

केंद्र, राज्याच्या योजना घराघरांत पोहोचवू : मंत्री सावे

केंद्र आणि राज्याच्या विविध योजना आहेत. ज्यापासून नागरिक वंचित असतात. त्या सर्व योजना घराघरांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही देत शहराचा पाणीप्रश्न दोन महिन्यांत मार्गी लागणार असल्याचे आश्वासन ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६०० कोटी दिले. त्याअगोदर त्यांनीच शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ५५ दिवसांतच मार्गी लावत १६८० कोटींची योजना मंजूर केली, परंतु त्यानंतर आलेले उबाठाच्या सरकारने योजनेच्या संचिकेला फुटबॉल केले.

त्यामुळे कधी संचिका मातोश्रीवर तर कधी पालकमंत्र्यांच्या घरी होत होती. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दोन महिन्यांतच शहराला मुबलक पाणी मिळेल, अशी ग्वाही मंत्री अतुल सावे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला छत्रपती संभाजीनगर नाव दिले. त्यामुळे या संभाजीनगरचे नगरसेवक भाजप-चेच असावे, त्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची असल्याचे आवाहन ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT