

IPPAI Conference: Mahavitaran honored with 6 awards
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आयपीपीएआय) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि.१०) गौरवण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले.
आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे ७ते १० जा-नेवारीला २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
यात स्मार्ट ग्रिड सोल्यूशन्सच्या अंमलबजावणी, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, सर्वोत्तम बॅटरी स्टोरेज प्रकल्प, ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा साठवणूक तंत्र-आयटी अप्लिकेशन, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि ग्रीन हायड्रोजन, अमोनिया नियोजनातील सर्वोत्तम राज्य या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
राज्य विद्युत नियामक आयोगांचे अध्यक्ष, वीज वितरण, पारेषण, निर्मिती व लोड डिस्पॅच सेंटर्सचे वरिष्ठ अधिकारी, अक्षय ऊर्जा, वित्तीय संस्था आदींचे देशभरातील सुमारे ५०० प्रतिनिधी उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग वर चर्चा
या परिषदेत वितरण व पारेषण नियोजन, अक्षय ऊर्जेला ग्रीडमध्ये सामावून घेताना येणारा ताण व आव्हाने, मागणीचा अंदाज आणि संसाधन पर्याप्तता नियोजन, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थितीबाबत उपाययोजना, उदयोन्मुख तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग आदींवर चर्चा करण्यात आली.