Elderly woman swindled of ₹12 lakh in 18-day 'digital arrest' scam
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मनी लॉड्रिग, मानवी तस्करी आणि ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवली. तब्बल १८ दिवस महिलेला डिजिटल अरेस्ट ठेवून सायबर भामट्यांनी तिच्या पतीच्या मृत्यूनंतरची सर्व जमापुंजीचे तब्बल १२ लाख रुपये लुबाडले. हा प्रकार २ ते २० मे या काळात बेगमपुरा भागात घडला.
फिर्यादी अरुणा उदय माने (६९, रा. माने बंगला, विद्युत कॉलनी, बेगमपुरा) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गृहिणी असून, पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. २ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्याने दिल्लीच्या बाराखंभा पोलिस ठाण्यातून विजयकुमार शर्मा बोलत असल्याचे सांगितले. आम्ही तुमचा फोन बंद करणार आहोत, हा तुमचा व्हॉट्सअॅप नंबर आहे का? अशी विचारणा करून त्याने फोन कट केला.
लगेचच त्याच क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. भामट्याने स्वतःची ओळख आयपीएस सुनील गौतम अशी सांगितली. तुमचे दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेत खाते असून, त्यातून ६ कोटींचे कोटींचे मनी मनी लाँड्रिंग, ल ड्रग्ज ट्रॅफिकिंग आणि मानवी तस्करी झाली आहे. यासाठी तुमच्या खात्यात २ लाखांचा नफा जमा झाला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत आणि फोन बंद करणार आहोत," अशी धमकी दिली.
अरुणा यांनी दिल्लीत कोणतेही खाते नसल्याचे सांगितले, मात्र भामट्याने काहीच ऐकून घेतले नाही. त्यानंतर भामट्याने अरुणा यांच्या मुलीला बोलावण्यास सांगितले. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी 'सीबीआय टीम लीडर प्रदीप सिंग' यांना मदत करण्याबाबत एक पत्र लिहून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास भाग पाडले. या प्रकाराबाबत कोणालाही काही न सांगण्याची आणि गुप्तता पाळण्याची सक्त ताकीदही (डिजिटल अरेस्ट) भामट्याने दिली.
एफडी मोडून ट्रान्सफर केले १२ लाख
तुमच्या बँक खात्यांची आणि जमा रकमेची तपासणी सीबीआय करणार आहे. तुमच्या सर्व खात्यांमधील रक्कम आम्ही दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या (नागावारा, बंगळुरू शाखा) चालू खात्यावर जमा करा. तपास पूर्ण होताच व्याजासकट परत करू, असे सांगितले. घाबरलेल्या अरुणा यांनी २० मे रोजी तिन्ही बँक खात्यांमधील जमा रक्कम आणि एफडी मोडून तब्बल १२ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर २ जूनपर्यंत रक्कम परत न आल्याने आणि भामट्यांचा संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव करत आहेत.
दररोज व्हिडिओ कॉल करून चौकशी
३ मे रोजी सायंकाळी भामट्याने पुन्हा व्हिडिओ कॉल करून अरुणा आणि त्यांच्या मुलीची चौकशी सुरू केली. तुमच्या आजूबाजूला कोणी अचानक श्रीमंत झाले का? गेल्या वर्षी कुठे प्रवास केला? तुमची महत्त्वाची कागदपत्रे कोठे वापरली? किती बँक खाते आहेत? अशी प्रश्न विचारली. तो दररोज व्हिडिओ कॉलवर चौकशी करून कोणाला काही सांगू नका, अशी धमकी द्यायचा.