Digital Arrest Scam | वृद्धेला दीड महिना डिजिटल अरेस्ट ठेवून १४ लाख उकळले file photo
छत्रपती संभाजीनगर

Digital Arrest Scam | वृद्धेला दीड महिना डिजिटल अरेस्ट ठेवून १४ लाख उकळले

हा प्रकार ८ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान जवाहर कॉलनीत घडला.

पुढारी वृत्तसेवा

Elderly Woman Held Under 'Digital Arrest' for Six Weeks; ₹14 Lakh Extorted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात नाव असल्याची भीती दाखवून आणि सीबीआय व दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटे व्हिडिओ कॉल करून एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेकडून भामट्यांनी तब्बल १३ लाख ५० हजार रुपये उकळले. हा प्रकार ८ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान जवाहर कॉलनीत घडला. या प्रकरणी शनिवारी (दि. १६) जवाहरनगर पोलिस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शोभा जोशी (७३, रा. जवाहर कॉलनी) या शहरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरील महिलेने स्वतःचे नाव अनन्या शर्मा सांगून, जोशी यांच्या नावे असलेल्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर कामे होत असल्याची बतावणी केली. थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. कॉलवरील पोलिस गणवेषातील व्यक्तीने स्वतः चे नाव सुनील कुमार गौतम, आयपीएस अधिकारी (दिल्ली पोलिस) असे सांगितले.

त्याने शोभा यांच्या बँक खात्याचा वापर करून मनी लाँड्रिंग केल्याचा बनाव रचला. विश्वासात घेण्यासाठी त्याने शोभा यांचा फोटो असलेले पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्सही व्हिडिओ कॉलवर दाखवली. तपासासाठी - दिल्लीला यावे लागेल, अन्यथा ऑनलाईन सहकार्य करा असा दम भरला. त्याने सीबीआय टीम लीडर प्रदीप सिंग यांच्या नावे पत्र लिहिण्यास सांगून दररोज व्हिडिओ कॉलद्वारे हजेरी देण्यास भाग पाडले.

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील असे सांगून भामट्यांनी पैशांची मागणी केली. घाबरलेल्या शोभा यांनी एफडी मोडून युको बँक आणि ए.यू. बँकेच्या खात्यांवरून एकूण १३ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले.

फेब्रुवारी महिन्यात जोशी या अमेरिकेला मुलाकडे गेल्यावर त्यांनी हा प्रकार सांगितला. मुलाने गुगलवर शोध घेतला असता व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती तोतया असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे खात्रीशीर समजताच त्यांनी शहरात परतत जवाहरनगर ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT