Elderly woman complains to PMO for water connection
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात अगोदरच आठ ते दहा दिवसांआड होणाऱ्या पाणीप-रवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात रस्त्यासाठी केलेल्या खोदकामामुळे जे अधिकृत नळ कनेक्शन महापालिका नियुक्त कंत्राटदाराने तोडले. ते कनेक्शन जोडून देण्याकडे महापालिकेने सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे त्रस्त झालेल्या वृद्ध महिलेने थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.
शहरवासीयांना नियमित आणि मूबलक पाणीप-रवठा करता यावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महापालिकेला २७४० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम सध्या ८० टक्के पूर्ण झाले असून लवकरच पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्या शहरवासीयांना ८ ते १० दिवसांआडच पाणी मिळत आहे. परंतु, असे असतानाही टिळकनगर येथील एक कुटुंब तब्बल ८ ते ९ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. महापालिकेच्या एनओसीनंतर लोकप्रतिनिधीच्या निधीतून टिळकनगर भागात गेल्या वर्षी रस्त्याचे काम करण्यात आले.
या कामासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. या खोदकामावेळी रस्त्याच्या कंत्राटदाराने या परिसरातील पाणीपुरवठा करणारी अंतर्गत लहान क्षमतेची जलवाहिनी फुटली. त्यानंतर ती जलवाहिनी जोडून देण्याऐवजी कंत्राटदाराने ती काढून नेली. त्यावर अनेकांच्या नळ जोडण्यात होत्या. परंतु, मुख्य वितरण पाईपच काढून नेल्याने येथील नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यावरून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाईपसाठी रहिवासी नागरिकांनीच पैसे जमा करावे, असा सल्ला दिला. त्यावर परिसरातील रहिवासी मंगला माणिकराव कुलकर्णी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे नळ कनेक्शन जोडून देण्यात आले नाही. त्यांनी याबाबत सतत महापालिकेकडे तक्रार केली. पाठपुरावा करून आयुक्तांकडेही तक्रार केली. मात्र, त्यांचे नळ जोडून देण्यात आले नाही. अखेर त्यांना याबाबत थेट पीएमओ कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार करावी लागली आहे.
महापालिका वारंवार काम झाले म्हणून आमची तक्रार निकाली काढत आहे. मात्र, मागील दहा महिन्यांपासून एकदाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नळ कनेक्शन जोडून दिलेले नाही. यात शहर अभियंता ए.बी. देशमुख यांनी तर सपशेल दुर्लक्षच केले, असेही आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
याबाबत राज्य शासनाने महापालिकेला नळ कनेक्शन तातडीने जोडून देण्याचे आदेश दिले आहेत. पंरतु, त्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही नळ जोडून दिलेले नसल्याचे कुलकर्णी कुटूंबाकडून सांगण्यात येत आहे.