Elderly man robbed in Jawaharnagar, chain and mangalsutra snatched in Shreynagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात रस्त्यावर गुंड, मवाली, सराईत गुन्हेगार, नशेखोर लूटमार करून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनांसोबत आता मंगळसूत्र चोर आणि तोतया पोलिसांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाला सीआयडी असल्याची बतावणी करून दोन तोतयांनी १० ग्रॅमची अंगठी लुबाडून नेली. पळून जाताना त्याच दोघांनी श्रेयनगर भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, चेन हिसकून नेली. या घटना अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने घडल्या.
पहिल्या घटनेत फिर्यादी राघवेंद्र गुंडोबा नाईक (८०, रा. विश्वभारती कॉलनी) हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत खिवंसरा पार्कच्या मोकळ्या मैदानमार्गे जाताना निलगिरीज सी ५ बंगल्यासमोर नऊच्या सुमारास एकाने त्यांना इशारा करून बोलावून घेतले. त्याने सीआयडी पोलिस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. तुमच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून रुमालात बांधून खिशात ठेवा, असे सांगितले. नाईक यांनी घाबरून बोटातील एक तोळ्याची अंगठी आणि मोबाईल रुमालात बांधले. मात्र भामट्याने व्यवस्थित बांधले का बघू द्या म्हणत रुमाल घेऊन परत दिला. नाईक यांनी रुमाल काढून पहिले तर अंगठी गायब होती. तोपर्यंत भामटा त्याच्या जोडीदारासोबत दुचाकीवर बसून क्रीडा संकुलाच्या दिशेने पसार झाला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत याच दोन भामट्यानी पळून जाताना श्रेयनगर येथील दुर्गा बंगल्यासमोर ९ वाजून २० मिनिटांनी फिर्यादी वसंती राघवेंद्र शनॉय (७६, रा. श्रेयनगर या पतीसह मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. वसंती या पतीच्या मागेमागे चालत जात असताना याच दोन दुचाकीस्वार चोरांनी येऊन दागिने ओरबाडले. सुदैवाने वसंती या घटनेत पडून जखमी झाल्या नाहीत. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.
शहरात तोतयाने सहा महिन्यांत १४ जणांना लुबाडून लाखोंचा ऐवज लंपास केल्यानंतर ही १५ वी घटना घडली आहे. उस्मानपुऱ्यात मंगळसूत्र चोरीची ७ वी घटना असून, एकही उघडकीस आलेली नाही. तर जवाहरनगर भागातील तोतयाने लुबाडल्याची ५ वी घटना आहे. त्यातही अद्याप एकही तोतया सापडलेला नाही, हे विशेष.
जवाहरनगर भागात सोमवारीच दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावले होते. त्यानंतर पुन्हा तोतयाने लुबाडून उस्मानपुरा हद्दीत तीन तोळ्यांचे दागिने हिसकावले. त्यामुळे हा भाग नेहमीच टार्गेट होत असताना पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण आहे.