Elderly man dragged by his mangalsutra and thrown onto the road, eye ruptured
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मंगळसूत्र चोरटे आता महिलांच्या जीवावर उठले आहेत. पोलिसांचा धाक नसल्याने जवाहरनगर भागात तर धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (दि.४) रात्री साडेआठच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरट्यांनी त्यांना ओढून रस्त्यावर पाडले. यात महिलेचा डोळा फुटला असून, त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. स्वरूपा प्रकाश वेरूळकर (६३, रा. विश्वभारती कॉलनी) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जवाहरनगर पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फिर्यादी प्रतीक प्रकाश वेरूळकर (४३, रा. विश्वभारती कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास त्यांची आई स्वरूपा या ओंकारेश्वर मंदिर येथून दर्शन करून घरी परत येत होत्या. जय विश्वभारती कॉलनी,
श्रीराम मंदिर रस्त्याने कमानीजवळ येताच स्पोर्ट बाईकवर चेतक घोडा रस्त्याकडून दोन जण स्वरूपा यांच्याजवळ आले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करताच मंगळसूत्रासह त्यांना चोरट्याने झटका मारून मोपेडजवळ रस्त्यावर पाडले. मंगळसूत्र न तुटल्याने स्वरूपा यांनी आरडाओरड केल्याने चोरटे तेथून पसार झाले. मात्र स्वरूपा यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होऊन त्या गंभीर जखमी अस्वस्थेत वेशुद्ध पडल्या. लोकांनी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला मात्र ते पळून गेले. त्यानंतर कॉलनीतील लोकांनी स्वरूपा यांना रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्या सध्या बेशुद्ध आहेत. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
स्वरूपा या रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या समोरून दोन जण स्पोर्ट बाईकवर आले. मागे बसलेल्या एकाने गळ्यातील मंगळसूत्र खेचले. तुटत नसल्याने अक्षरशः मंगळसूत्रासह स्वरूपा यांना चोरट्यांनी ओढून रस्त्यावर आपटले. यात त्यांचा डोळा फुटला. आरडाओरड केल्याने कुत्रे भुंकू लागली. लोक धावत येताच चोरटे पसार झाले.