ई-ऑफिस सर्व्हर ठप्प, महापालिकेचे कामकाज खोळंबले file photo
छत्रपती संभाजीनगर

E-Office Server Down : ई-ऑफिस सर्व्हर ठप्प, महापालिकेचे कामकाज खोळंबले

४ दिवसांपासून एकही फाईल अपलोड नाही : कर्मचाऱ्यांना अडचण

पुढारी वृत्तसेवा

e-Office server down; municipal corporation operations stalled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज ऑनलाईन झाल्यानंतर प्रथमच ई-ऑफिस प्रणालीच्या सर्व्हरमध्ये गंभीर बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे. नवीन फाईल अपलोड होत नसल्याने तसेच प्रलंबित फाईली पुढे सरकत नसल्याने विविध विभागांतील निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला असून, महापालिकेतील सुमारे ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामात अडचण होत आहे.

महापालिकेत एप्रिल २०२५ पासून ऑफलाईन फाईल पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली असून, सर्व कामकाज ई-ऑफिसद्वारेच केले जाते. शासनाच्या धोरणानुसार सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे फाईलची सद्यस्थिती, ती कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, याची ऑनलाईन माहिती उपलब्ध होते. कोणत्याही अधिकाऱ्याला तीन दिवसांपेक्षा अधिक काळ फाईल प्रलंबित ठेवता येत नाही. तसेच महापालिकेतील सुमारे ५०० अधिकारी-कर्मचारी या प्रणालीचा वापर करतात.

त्यामुळे मागील वर्षभरात ई-ऑफिसद्वारे सुमारे १३ हजार फाईलींना मंजुरी देण्यात आली. तर एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत चार हजारांहून अधिक फाईली या माध्यमातून निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या एनआयसीच्या अधिपत्याखाली ही प्रणाली कार्यरत आहे. मात्र शनिवारी (दि.१) एनआयसीने सर्व्हरच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती दिली होती.

दुसऱ्या दिवशी रविवारी काही काळ सेवा पूर्ववत झाली, मात्र सोमवारपासून सर्व्हर पुन्हा पूर्णपणे बंद पडला. त्यानंतर बुधवारी (दि.५) महापालिकेच्या संगणक विभागाने एनआयसीकडे तक्रार नोंदविल्यानंतर काही तास सर्व्हर सुरू झाला, परंतु पुन्हा बंद पडला. दुरुस्तीसाठी आणखी किमान एक दिवस लागणार असल्याची माहिती एनआयसीने दिल्याचे संगणक कक्ष प्रमुख मोहम्मद आदील यांनी दिली.

ई-ऑफिस ठप्प; परिणाम काय ?

सर्व्हर चार दिवसांपासून बंद

नवीन फाईल अपलोड होऊ शकत नाही.

प्रलंबित फाईली पुढे सरकत नाहीत.

५०० अधिकारी-कर्मचारी प्रभावित सर्व विभागांचे प्रशासकीय कामकाज मंदावले.

निर्णय प्रक्रिया आणि मंजुरींना विलंब.

ई-ऑफिसची पार्श्वभूमी एप्रिल २०२५ पासून ऑफलाइन फाईल पद्धत बंद.

सर्व कामकाज ई-ऑफिसद्वारेच.

फाईल मंजुरीचा आढावावर्षभरात सुमारे १३ हजार फाईली निकाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT