कन्नड : पावसाळ्यातील सर्वाधिक अपेक्षेचा काळ असलेला श्रावण महिना यंदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा देणारा ठरला आहे. श्रावणात अपेक्षित पावसाने दडी मारल्याने शेतशिवारातील पिकांची वाढ खुंटली असून, जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने खरीप पिकांवर पाण्याच्या ताणाचे सावट निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या या महिन्यात निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. शेतशिवारात पिकांची वाढ सुरू झालेली असते. त्यामुळे श्रावण हा निसर्ग, शेती आणि भक्तीचा सुंदर संगम मानला जातो. यंदा श्रावणाच्या सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस, मका, तूर आदी पिकांवर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पिकांची अपेक्षित उंची झालेली नसून पाने कोमेजण्यास सुरुवात झाली आहे.
श्रावण महिन्यात पिकांना सातत्याने पावसाची आवश्यकता असते. याच काळात पिकांची जोमाने वाढ होऊन फुलोरा व शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ मंदावली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
खत, बियाणे, मशागत, फवारणी यासाठी मोठा खर्च केल्यानंतर आता पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आकाशात ढग दाटून येतात; मात्र अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पुन्हा मावळत आहेत.
श्रावणातील उर्वरित काळात चांगला पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, एक-दोन दमदार सरींची प्रतीक्षा आहे. अन्यथा खरीप हंगामातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांतील पावसाची स्थिती
कन्नड तालुक्यात श्रावण महिन्यातील पावसाच्या प्रमाणात मागील काही वर्षांत मोठी चढ-उताराची स्थिती दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२५ या चार वर्षांत पावसाचे प्रमाण सातत्याने बदलले आहे. २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात १४४.५० मिमी, तर २०२३ मध्ये १०४.९० मिमी पावसाची नोंद झाली. २०२४ मध्ये पर्जन्यमान वाढून १८६.४५ मिमी झाले. त्यानंतर २०२५ मध्ये ऑगस्ट महिन्यात २५३.१० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. त्यामुळे या कालावधीत २०२५ हे वर्ष सर्वाधिक पावसाचे ठरले तर यंदा ऑगस्ट महिन्यात अल्प पाऊस पडला आहे. पिकांना सध्या दमदार पावसाची गरज आहे.