Drugs including 550 kg of marijuana, 2,000 pills seized in a month
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मराठवाड्यात नशेचा बाजार उलथवून टाकण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या असून, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या आदेशावरून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल २४ कारवाया करून ५५० किलो गांजा, २ हजार नशेच्या गोळ्यांसह एम डी ड्रग्स असा दीड कोटीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गुन्हेगारीचे मूळ हे नशेखोरीत आहे. नशेखोरांकडून गंभीर गुन्हे घडत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी नशेचा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्याअनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनीही सुरुवातीपासूनच परिक्षेत्र नशामुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
सर्व पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, ठाणे प्रभारी यांना विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, जालना आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत पोलिसांनी २४ गुन्हे दाखल करून ४४ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
या कारवाईत ५५० किलो गांजा, नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या २ हजार गोळ्या, एमडी ड्रग्स पावडर असा दीड कोटीचा ऐवज जप्त केला.
एनडीपीएसच्या कारवाया यापुढेही अशाच प्रकारे सुरू रा-हणार असून, नशा करणारे, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांत नागरिकांनी द्यावी.- वीरेंद्र मिश्र, विशेष पोलिस महानिरीक्षक