Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन द्या - शिक्षक समिती file photo
छत्रपती संभाजीनगर

Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन द्या - शिक्षक समिती

यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Drought : Pay one day salary of teachers for drought affected farmers - Teachers Committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे हे सामाजिक व नैतिक कर्तव्य असल्याची भूमिका समितीने मांडली आहे. शिक्षकांची सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याच्या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

शासनाचे नियम आणि आवश्यक संमतीनुसार याबाबत कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय साळकर, राज्य प्रवक्ते नितीन नवले, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, संपर्कप्रमुख कडूबा साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष काकासाहेब मगर आणि कोषाध्यक्ष दिलीप रासने यांनी पुढाकार घेतला. जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सतीश कोळी यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT