Marathwada Drought : इतिहासाच्या पानांतून : सव्‍वाशे वर्षापूर्वीचा एका छायाचित्रातील दुष्काळ file photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Drought : इतिहासाच्या पानांतून : सव्‍वाशे वर्षापूर्वीचा एका छायाचित्रातील दुष्काळ

पूर्वी पडणारे हे दुष्‍काळ म्‍हणजे अन्‍नधान्‍य, पाणी मिळत नसल्‍याने मृत्‍यू.. या मृत्‍यूच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍याच आहेत..

पुढारी वृत्तसेवा

Drought: From the Pages of History: A Famine in a Photograph from 1600 Years Ago

पुढारी वृत्तसेवा : सोबत असलेले छायाचित्र हे आफ्रिकेतील असावे, असेच वाटते ना..तसे नाही....हे छायाचित्र आहे मराठवाड्यात १८९९ ते १९०० या वर्षात पडलेल्‍या दुष्‍काळात होरपळून निघालेल्‍या मुलांचे. या मुलांना रांगेत उभे केले आहे, ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर...तेव्‍हाच्या आणि आताच्या दुष्‍काळाची भयानकता लक्षात येण्यासाठी छायाचित्र पुरेसे बोलके आहे. या काळात तत्‍कालिन निझाम संस्‍थानच्या ताब्यात असलेल्‍या प्रदेशात भयानक दुष्‍काळ पडला होता. मराठवाडा हा तेव्‍हा निझामाचा भाग. निझामाने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्‍न केले खरे, परंतु त्‍यास काही मर्यादा होत्‍या. निझामाच्या दरबारात असणारे छायाचित्रकार राजा लाला दीनदयाल यांनी दुष्‍काळी प्रदेशाचा दौरा करून छायाचित्रे काढली. सव्‍वाशे वर्षापूर्वी काढलेली छायाचित्रे हैदराबाद, नवी दिल्‍ली, इंदूर, परदेशातील ग्रंथालयात सुरक्षित आहेत.

१९ व्‍या शतकातील हा काही पहिला दुष्‍काळ नव्‍हता. १८०२ - १८०३, १८७६-१८७८, १८९६-१८९७ हे तीन मोठे दुष्‍काळ तेव्‍हा पडले होते. १८९९ चा दुष्‍काळ हा तुलनेने भीषण असा होता. त्‍यापूर्वीही तेराव्या, चौदाव्या, पंधराव्‍या शतकात मराठवाड्याला दुष्‍काळाशी सामना करावाच लागला. दुष्काळामुळे १६८५ मध्ये ज्वारी आणि तांदळाची पेरणी होऊ शकली नाही. १६८५ ते १६९१ या काळात पसरलेल्या एका साथीच्या रोगाने अर्धी लोकसंख्या नष्ट केली.

त्यानंतर १७०३ ते १७०६ या काळात दुष्काळ पडला. १७०२ मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आणि रब्बी पिकांचे उत्पन्नही घटले. १७०४-०५ मध्ये तीव्र दुष्काळ पडला आणि तो १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत कायम राहिला. १७२७-२८ मध्ये जालना आणि गंगापूर यांसारख्या तालुक्यांसह जिल्ह्याचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. १७४९ मध्ये तीव्र दुष्काळ पडला होता; त्यावेळी संभाजीनगरात धान्याचा भाव ८० रुपये प्रति पल्ला (जुन्‍या काळातील मोजमाप) इतका वाढला होता. १७८७ मध्ये आणखी एक दुष्काळ पडला, तेव्हा धान्य ९ शेर प्रति रुपया या दराने विकले जात होते.

त्‍यापूर्वीही दुष्‍काळ पडला होता, अशी नोंद इतिहासकारांनी घेतली आहे. अलाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्‍ला जिंकल्यानंतर मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी राज्याची सरकारी धान्यकोठारे खुली करण्यात आली आणि धान्याचे भाव कमी होईपर्यंत लोकांना धान्य विकले गेले. १३४१ मध्ये पावसाच्या कमतरतेमुळे संपूर्ण दख्खनमध्ये मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. ही स्थिती बहमनी राजवट स्थापन करेपर्यंत कायम राहिली.

मात्र, या सगळ्या दुष्‍काळात चर्चेत राहिला तो दुर्गादेवीचा दुष्काळ. हा दुष्काळ १३९६ मध्ये सुरू झाला आणि सलग ११ वर्षे चालला. पूर्वी पडणारे हे दुष्‍काळ म्‍हणजे अन्‍नधान्‍य, पाणी मिळत नसल्‍याने मृत्‍यू.. या मृत्‍यूच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍याच आहेत..शतके उलटली, काळ बदलला; पण दुष्काळाची वेदना मराठवाड्याच्या स्मृतीत आजही जिवंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT