वाळूज महानगर :अपघातात मृत्यू पावलेल्या पहिल्या पतीच्या अपघात विम्याच्या मिळालेल्या पैशावर डोळा ठेवून दुसरा पती व सासरकडील मंडळीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वडगाव येथील गरोदर महिलेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती व दिराला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याविषयी मृत पल्लवीची आई गोदावरी घोपटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी हिच्या पहिल्या पतीचा २०२१ मध्ये अपघाती मृत्यू झाल्यानंतर २०२४ मध्ये गोपाल अंबादास सहाणे (रा. स्वास्तिक सिटी, वडगाव को.) याच्यासोबत तिचा दुसरा विवाह करून दिला. पल्लवीला पहिल्या पतीपासून एक सहा वर्षांची मुलगी आहे. पहिल्या पतीच्या अपघात विम्याचे पल्लवीला ८० लाख रुपये मिळाले होते. त्यातील ४० लाख स्वतः च्या व ४० लाख रुपये पल्लवीने तिच्या मुलीच्या नावावर टाकले होते.
पल्लवीला मिळालेल्या पैशाविषयी समजल्याने सासरच्या मंडळीने सतत तिच्याकडे पैशाची मागणी करत पल्लवीला तिच्या खात्यावरून ३० ते ३५ लाख रुपये काढायला लावले. त्यानंतर पल्लवीच्या मुलीच्या खात्यावर असलेल्या पैशावर डोळा ठेवून गोपाल व त्याच्या घरच्यांनी पैशाची मागणी करत पल्लवीचा शारीरिक तसेच मानसिक छळ सुरू केला. सततच्या त्रासाला कंटाळून पल्लवीने १३ जानेवारी रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले होते.
या प्रकरणी पल्लवीचा पती गोपाल सहाणे, दीर समाधान सहाणे, अर्चना किशोर जाधव, किशोर जाधव व सविता चिकटे यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत.