छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून नवीन वर्षात शहरातील कचऱ्याचे हायटेक पध्दतीने संकलन कले जाणार असून, दररोज पावणेपाचशे ते पाचशे टन कचरा संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाणार आहे. त्यासाठी कचरा संकलनाची वाहने दोन किंवा गरजेनुसार तीन शिफ्टमध्ये चालवली जातील.
शहरातील कचरा संकलन करून तो प्रक्रिया केंद्रांपर्यंत वाहतूक करण्याचे काम बेंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे आहे. सात वर्षांच्या कराराची ही मुदत येत्या जानेवारीअखेर संपत असून, त्याऐवजी नवीन कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी काढलेल्या निविदेत तीन कंपन्यांनी सहभाग घेतला असून, यात वेस्टर्न इमॅजनरी ट्रान्सकॉर्न (अहमदाबाद), ओम स्वच्छता कॉर्पोरेशन (सुरत) आणि जीगर ट्रान्सपोर्ट कंपनी (मुंबई) यांचा समावेश आहे.
नव्या कंपनीमार्फत १ फेब्रुवारीपासून कामकाज सुरू होईल. सुरुवातीला दोन शिफ्ट ठेवण्यात आल्या आहेत. मात्र आवश्यकतेनुसार तिसरी शिफ्टही राबवली जाईल. शहरात एकावेळी ४०० घंटागाड्या कामाला लागतील. सध्या ३०० गाड्यांचा वापर केला जातो. नव्या गाड्यांची क्षमता १२०० किलो असेल, तर सध्याच्या गाड्यांची क्षमता ८०० किलो आहे. सर्व गाड्यांना झाकण असणार असल्याने वाहतुकीदरम्यान कचरा खाली पडणार नाही किंवा उडणार नाही, असे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. तसेच यासंबधीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्राप्त झालेल्या निविदांची आधी टेक्निकल पडताळणी केली जाईल.
शहरात सहा ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहेत. प्रत्येक गाडीतून ९५ टक्के ओला-सुका वर्गीकृत कचराच प्रक्रिया केंद्रात पोहोचवला जाईल. यातील नियमांचे पालन न झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर ३ टक्के दंड आकारला जाणार आहे. तसेच करार सुरू झाल्यापासून तीन महिन्यांत पॉइंट ऑफ इंटरॅक्शन प्रणाली लागू करणे बंधनकारक असेल. या माध्यमातून दीडशे कर्मचारी नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करतील.