Phulambri Doctor Assaults Patient
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ तयार करून पोलिसांत तक्रार दिल्यास तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रारही पीडित महिलेने केली आहे. या प्रकरणामुळे फुलंब्री शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डोकेदुखीचा त्रास होत असल्याने संबंधित महिला फुलंब्री येथील एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून औषधे दिल्यानंतर महिलेला गुंगी आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर डॉक्टरांनी अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. पोलिसांत तक्रार केल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फुलंब्री पोलिसांनी डॉक्टर रामदास महादू तरडे (वय ५०) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.