Do not publish the final promotion list until further orders.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
बढतीपात्र शिक्षकांची विस्तार अधिकारी पदाची अंतिम यादी पुढील आदेशापर्यंत प्रकाशित करण्यात येऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला दिले आहेत. टीईटी पास नसल्यामुळे बढतीपात्र प्राथमिक यादीत नाव न आल्याने दाखल याचिकेच्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सिंदोन येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले संजय रामकृष्ण भोसले हे सेवा ज्येष्ठतेच्या नियमाने विस्तार अधिकारी पदावर बढतीसाठी पात्र होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अथवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परीक्षा बंधनकारक केल्यामुळे तसेच बढतीसाठी देखील सदर परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेल्या विस्तार अधिकारी बढती पात्र शिक्षकांच्या प्राथमिक यादीत त्यांचे नाव समाविष्ट नाही.
त्याबाबत त्यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देऊन त्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट करावे, अशी विनंती केली होती. तसेच सवाच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा पास करण्यासाठी एक सप्टेंबर २०२७पर्यंतची मुदत दिली असल्यामुळे आपल्या मागणीचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती.
मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अॅड. देविदास आर. शेळके यांच्यामार्फत धाव घेतली. सदर याचिकेवर सुनावणी झाल्यावर उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेने याबाबतची अंतिम यादी पुढील तारखेपर्यंत प्रकाशित करू नये, असा अंतरिम आदेश दिला आहे.
तत्पूर्वी जिल्हा परिषदेने आपले लेखी म्हणणे सादर करावे, असेही न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. देविदास आर. शेळके यांनी बाजू मांडली. जिल्हा परिषदेच्या वतीने अॅड. एस. आर. ढेपले यांनी बाजू मांडली. या याचिकेवर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.