छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी भेट आणि दिवाळी अग्रीम दिला जाणार आहे. त्यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत यांनी लेखा विभागाला आदेश दिले असून, त्यानुसार ग्रेड पे १८०० रुपये अथवा एस ०५ पेक्षा अधिक नसेल, त्यांना ३५०० रुपये, तर कंत्राटींना २ हजार रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. त्याशिवाय ज्यांचे ग्रेड पे ४ हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त नाही. त्या नियमित कर्मचाऱ्यांना १२५०० रुपये अग्रीम दिला जाणार आहे.
महापालिका आपल्या नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणान आहे. दिवाळी अग्रीमच्या रकमेसह, सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट देण्यासाठी महापालिकेला २ कोटी ४२ लाख ४ हजारांचा खर्च करावा लागणार आहे. महापालिका आस्थापनेवरील ६८६ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार ५०० रुपये अग्रीम दिला जाणार आहे. त्यासाठी ८५ लाख ७५ हजार रुपये लागणार आहे. शिक्षण विभागातील २४७ कर्मचाऱ्यांना अग्रीम रकमेचा लाभ मिळणार असून, त्यासाठी ३० लाख ८७ हजार ५०० रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना ३५०० सानुग्रह अनुदान
महापालिका आस्थापनेवरील २२०५ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५०० रुपये यानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ७७ लाख १७हजार ५०० रुपयांची तरतूद केली आहे. तर दैनिक वेतनावरील ११ कर्मचारी, ११५ बालवाडी शिक्षिका, ३२ तासिका तत्त्वावरील शिक्षिका, चार लिंक वर्कर्स, सुपरवायझर, बचत गटाचे ३६० सफाई मजूर यांना प्रत्येकी २ हजार प्रमाणे १० लाख ४४ हजार रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. दरम्यान, अग्रीमची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतनातून प्रत्येकी १२५० रुपये वसूल केली जाणार आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी पूर्ण केली आहे.