

नाशिक : दिवाळीनिमित्त महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तब्बल २३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेतील कायम कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनिस, रोजंदारी व मानधनावरील पाच हजार कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेत काम करणाऱ्या परंतु शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांना देखील प्रत्येकी १४ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने २५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी २३,५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
महापालिका आस्थापनेवरील कायमस्वरुपी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका, मदतनिस, अंशकालिन शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी, एनयुएचएम, एनयुएलएम कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. गतवर्षी दिवाळीनिमित्त कायम कर्मचाऱ्यांना २० हजार तर शासन अनुदानातील कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा कायम कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात ३,५०० तर शासन अनुदानातील कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात ४१०० रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४,१०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
तिजोरीवर पंधरा कोटींचा बोजा
यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटींचा बोजा पडणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल एस-१७ व त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने आयुक्तांसह अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त, अधिक्षक अभियंता, शहर अभियंता, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखापरिक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्तांना सानुग्रह अनुदान मिळणार नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका.
दिवाळीनिमित्त महापालिकेतील कायम तसेच मानधन, रोजंदारीवरील तसेच शासन अनुदानावर काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. आयुक्तांनी या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना.