Divorced Woman Sexually Exploited Under the Pretext of Marriage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: माझी पत्नी नेहमी आजारी असते, तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करीन, असे खोटे आश्वासन देत घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाने दोन वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला.
चंद्रकांत रावसाहेब नवपुते (रा. टीव्हीसेंटर) असे आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी आणि आईने पीडितेला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. तिघांविरुद्ध पडेगावावातील ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचा घटस्फोट झाला असून, ती आपल्या १० वर्षीय मुलीसह व आई-वडिलांसोबत राहते. सन २०२३ मध्ये चिकलठाणा येथील हिनानगर भागात गणपती बनवण्याचे काम करत असताना तिची ओळख चंद्रकांत नवपुते (रा. टीव्हीसेंटर, छत्रपती संभाजीनगर) याच्याशी झाली होती.
जानेवारी २०२४ मध्ये आरोपी चंद्रकांत याने पीडितेच्या घरी जाऊन, माझी बायको नेहमी आजारी असते, मी तिला घटस्फोट देणार आहे व मी तुझ्याशी लग्न करेन, असे खोटे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याने पीडितेसोबत तिच्या राहत्या घरी तसेच हॉटेल ७ अॅपल येथे लग्नाचे वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेने चंद्रकांतकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास नकार देत शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. हा प्रकार चंद्रकांतच्या घरी समजल्यानंतर पीडितेने त्याच्या घरी जाऊन त्याची आई आणि पत्नीला या संबंधांबद्दल माहिती दिली. मात्र त्या दोघींनीही पीडितेला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
आरोपी राजकीय पदाधिकारी !
मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही, तू जर जास्त शहाणपणा केला तर तुझे माझ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी नवपुतेने पीडितेला दिली. नवपुते हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक गीता हाके करत आहेत.