Dnyanradha Multistate Credit Society Vaijapur
वैजापूर : आयुष्यभराची कमाई विश्वासाने ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जमा केली; मात्र मुदत संपूनही ठेवींची रक्कम हातात पडत नसल्याने वैजापूर शहरासह ग्रामीण भागातील ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २३) बीड येथील जिल्हा निबंधक कार्यालयाच्या पथकाने ज्ञानराधाच्या वैजापूर शाखेची झडती घेतली. या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज आणि सोन्याची ४९ पाकिटे ताब्यात घेण्यात आली. मात्र, शाखेत अडकलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कधी परत मिळणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक वैजापूर शाखेत दाखल झाले. पथकाने शाखेतील कागदपत्रांची तपासणी करून संबंधित जागेचा पंचनामा केला. यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांसह दस्तावेजांचे दोन ते तीन गठ्ठे ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची तपासणी होणार आहे.
या कारवाईदरम्यान शाखेत सोन्याची ४९ पाकिटे आढळून आली. ती पथकाने ताब्यात घेतली आहेत. याबाबत बीडचे जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी सांगितले की, संस्थेचा तपास सुरू असून, शुक्रवारी पंचनामा करण्यात आला. शाखेत आढळलेली सोन्याची ४९ पाकिटे ताब्यात घेण्यात आली आहेत. संबंधित खातेदारांनी बीड येथे जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले सोने सोडवून न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पथक शाखेत दाखल झाल्याची माहिती मिळताच ठेवीदारांनी तेथे गर्दी केली. अनेकांनी आपल्या ठेवींची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोन्याच्या पाकिटांबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना मुदतठेवींच्या परताव्याचे काय, असा सवाल ठेवीदारांकडून उपस्थित केला जात आहे.
कागदपत्रांची तपासणी, पंचनामा आणि सोन्याची पाकिटे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ठेवीदारांच्या हक्काचे पैसे कधी मिळणार, याबाबत अद्याप ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे वैजापूरमधील ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आपल्या कष्टाच्या पैशांच्या परताव्याची प्रतीक्षा कायम आहे.