छत्रपती संभाजीनगर : विजे बाबतच्या नागरिकांच्या समस्या, अडअडचणी सोडवण्यसाठी दर तीन महिन्यांला जिल्हा विद्युत समितीची बैठक घेण्याचा नियम आहे. जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरेंना तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या या जबाबदारीची आठवण झाली. आणि शनिवारी (दि.१६) पहिल्यांदाच या समितीची बैठक महावितरणच्या कार्यालयात घेतली. यात त्यांनी नागरिकांच्या तक्रारीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान या बैठकीत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी महावितरणचे अधिकारी ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले.
उन्हाळा सुरू होताच नागरिक वीज गुलमुळे हैराण आहेत. तसेच स्मार्ट मीटर व इतर कारणांमुळेही नागरिक संभ्रमात आहेत. तसेच शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी खासदारांनी बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष करत खासदारांनी चक्क दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ही बैठक घेतली.
यावेळी समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे, सदस्य तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जा, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, महापौर समीर राजूरकर, समितीचे संयोजक तथा महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
करोडो रुपये खर्चुनही नागरिक अंधारात
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहर आणि ग्रामीण भागात सतत वीज खंडित होणे, अतिभारामुळे ट्रिपिंग, सोलार यंत्रणांच्या समस्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जनता वेळेवर बिल भरते, मग नागरिकांना अंधारात का राहावे लागते. तसेच कंत्राटदार एजन्सींना आगाऊ पेमेंट करूनही प्रत्यक्ष कामे वेळेत होत नाहीत, निकृष्ट दर्जाची कामे केली जातात, तक्रारींना प्रतिसाद दिला जात नाही यावरून अधिकारी ठेकेदार यांना शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा विद्युत समितीचे कार्य
ग्रामीण व शहरी भागातील वीजविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच वीजगळती कमी करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात यावा. यावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण तसेच सहभाग असावा. जेणेकरून विविध योजनांचा आढावा घेऊन पुढील सूचना करता याव्यात यासाठी ही समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अनुभवानुसार वरिष्ठ असलेल्या खासदारांकडे अध्यक्षपद सोपवण्यात येते.
योजनांच्या प्रगतीवर लक्ष द्या
सुधारित वितरण क्षेत्र योजना तसेच वितरण हानी कमी करण्यासाठी योजनांच्या प्रगतीला गती देण्याचे निर्देश खा. भुमरे यांनी दिले. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी जागा मिळत नाही त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून जागा उपलब्ध करून देऊ, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत प्रलंबित अर्ज निकाली काढा, अतिभारित रोहित्रांच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्रे बसवा, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासदारांचे लक्ष व्यवसायात, जनतेशी देणे घेणे नाही- 66 जिल्हा विद्युत समितीची बैठक महत्त्वाची असते. या बैठकांच्या माध्यमातून जनतेचे महावितरणशी संबंधित प्रश्न सोडविणे शक्य होते. परंतु सध्याच्या खासदारांना जनतेच्या सेवेचे देणे घेणे नाही. त्यांचे सगळे लक्ष त्यांच्या व्यवसायात आहे. मी खासदार असताना जिल्हा विद्युत समितीच्या तब्बल १३८ बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत ग्रामीण भागातील नागरिक, शहरातील नगर-सेवक आपले प्रश्न घेऊन येत. ते आम्ही तातडीने सोडवीत होतो.चंद्रकांत खैरे, माजी खासदार