District Collector inspects drought situation
पिशोर, पुढारी वृत्तसेवा : पावसाअभावी नाचनवेल परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जिल्हाधिकारी विनय गौडा व आमदार संजनाताई जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतशिवारात जाऊन त्यांनी पिकांची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा, सिंचन व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
परिसरात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून, पाण्याअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पाणीटंचाईवर तातडीने उपाय आणि दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या विविध योजनांचा लाभमिळवून देण्याची मागणी केली जिल्हाधिकारी गौडा व आमदार जाधव यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलिस अधिकारी अपरिचिता अग्निहोत्री, तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, सपोनि कुणाल सूर्यवंशी, मंडळ अधिकारी विकास वाघ यांच्यासह वसाहेब पवार, शिवाजी थोरात, पंचायत समिती सदस्य जगन जंगले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
पाणीटंचाईवर प्रभावी उपाय करून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता करावी.
विहिरी व बोअरवेलच्या घटलेल्या पाणीपातळीची दखल घ्यावी.
दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या विविध योजनांचा लाभशेतकऱ्यांना मिळवून द्यावा.
पिकांच्या संभाव्य नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी.