Sambhajinagar Political News : हर्षवर्धन जाधवांवरून दानवे-खैरेंमध्ये जुंपली File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Political News : हर्षवर्धन जाधवांवरून दानवे-खैरेंमध्ये जुंपली

खैरे म्हणाले, मी प्रवेश करू देणार नाही. दानवे म्हणाले, स्वैरेंच्या मतापेक्षा उद्धव ठाकरेंचा विचार महत्त्वाचा.

पुढारी वृत्तसेवा

Dispute between Danve and Khaire over Harshvardhan Jadhav

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या शिवसेना उबाठा पक्षातील संभाव्य प्रवेशावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात जुंपली आहे. दानवे यांनी शुक्रवारी मुंबईतील मातोश्रीवर निवासस्थानी शुक्रवारी हर्षवर्धन जाधव यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणली. तर दुसरीकडे खैरे यांनी जाधव यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध दर्शविला आहे. जाधव यांना पक्षात प्रवेश देऊ देणार नाही अशी भूमिका खैरे यांनी घेतली आहे.

शिवसेना उबाठा पक्षाला जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. मात्र, आता विविध पक्षांत जाऊन आलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे शिव-सेना उबाठात प्रवेश करण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी जाधव यांची मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. त्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. तर दुसरीकडे या प्रवेशावरून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते दानवे आणि खैरे यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.

जाधवांना प्रवेश मिळणार नाही - खैरे हर्षवर्धन जाधव यांच्या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. याआधी ते मीनाताई ठाकरे यांच्याविषयी चुकीचे बोलले आहेत. शिवाय तो माणूस स्वतःच्या पत्नीविषयी, जी आमदार आहे तिच्याविषयीही चांगले बोलत नाही. अशा माणसाला आम्ही पक्षात प्रवेश घेऊ देणार नाहीत, असे पक्षाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले.

पक्षप्रमुखांचा विचार महत्त्वाचा- अंबादास दानवे

मी माझ्या मनाने कोणतीही गोष्ट करत नाही. मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जो आदेश देतात, त्याचे मी पालन करतो. त्यांच्याच आदेशाने सर्व काही होत असते. हर्षवर्धन जाधव आणि उद्धव ठाकरे यांची कालच मातोश्रीवर भेट झाली. खैरेंना मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु माझ्यासाठी खैरेंच्या मतापेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विचार महत्त्वाचा आहे, असे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT