Digital Guide Tour QR Code at Ajanta Caves
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांना अधिक समृद्ध आणि आधुनिक अनुभव देण्यासाठी ऑडिओ-व्हिडिओ डिजिटल गाईड दूरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत लेणी परिसरात क्यूआर कोड आधारित ११ माहिती फलक (पॅनल्स) उभारण्यात आले असून, यामुळे पर्यटकांना गाईडशिवायही अजिंठा लेणीची सखोल माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
या पॅनल्सपैकी दोन पॅनल भिंतीवर बसविण्यात आले असून उर्वरित नऊ पॅनल्स स्टॅन्डसह अजिंठा लेणीतील महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. अजिंठा लेणीतील बुकिंग काउंटर शेजारी, पब्लिकेशन काउंटरसमोर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयासमोर, एमटीडीसी रेस्टॉरंटसमोर तसेच लेणी क्रमांक १, २, ४, ९, १६ आणि १७ समोर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील भित्तिचित्रांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित विविध जातक कथा अत्यंत जिवंत आणि प्रभावी शैलीत रेखाटलेल्या आहेत.
या माहितीफलकांचे अनावरण बैंकॉक येथील बौद्ध भदंत कोवित सिरिवन्नो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सापोनी प्रफुल साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षण सहायक अधिकारी मनोज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उपक्रम भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महानिर्देशकांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत यांच्या सहकायनि यशस्विरीत्या राबविण्यात आला.
जनगणनेचे वेळापत्रक
नव्या डिजिटल गाईड सुविधेमुळे पर्यटकांना क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या मोबाईलवर संबंधित लेणींचा इतिहास, वैशिष्ट्ये, चित्रांचे अर्थ आणि जातक कथांची माहिती ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होते. त्यामुळे भाषा अडथळा दूर होऊन देश-विदेशातील पर्यटकांना स्वतःच्या भाषेत ही माहिती जाणून घेता येईल. या क्यूआरकोडमुळे वेळेची बचत, अजिंठा लेणीची अचूक आणि अधिक सखोल माहिती मिळण्यास मदत होईल. या डिजिटल सुविधेमुळे अजिंठा लेणीतील पर्यटन अनुभव अधिक माहितीपूर्ण, सुलभ आणि संस्मरणीय होणार असल्याचे मत पर्यटकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.