डिजिटल अरेस्टचा काळा पैसा पांढरा करणारा गजाआड pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Digital arrest scam money laundering : डिजिटल अरेस्टचा काळा पैसा पांढरा करणारा गजाआड

एटीएसच्याही होता रडारवर ! सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १ कोटी ३६ लाखांची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि इतर सायबर गुन्ह्यांमधून लुटलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी चक्क विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या नावावर बैंक खात्याचा वापर करून लूट करणाऱ्या एका भामट्याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लक्ष भरतलाल तलरेजा (२२, रा. कृष्णा रेसिडेन्सी, मित्रनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.

तो देशभरातील सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या संशयास्पद कारनाम्यांमुळे यापूर्वी एटीएसनेही (दहशतवादविरोधी पथक) त्याला दोन वेळा उचलले होते. एक गुन्हाही एटीएसकडे दाखल आहे.

फिर्यादी निखिल प्रकाश साळवे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा गैरवापर करून १ जुलै ते १ सप्टेंबर २०२५ या काळात १२ लाख ५५ हजार रुपयांचे व्यवहार झाले होते. त्यांनी याप्रकरणी सायबर ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल तांत्रिक तपास करत असतानाच हे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले. ११ मार्च रोजी लक्ष तलरेजा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

आरोपी तलरेजा पैशांचे आमिष दाखवून शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या नावाने बँक खाती उघडायचा. त्या बँक खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड, मोबाईल सिमकार्ड संपूर्ण किट तो स्वतःच्या ताब्यात ठेवायचा. देशभरातून सायबर फसवणुकीद्वारे उकळलेली रक्कम या खात्यांवर जमा व्हायची आणि आरोपी एटीएम किंवा चेकद्वारे ही रोख रक्कम तात्काळ काढून घ्यायचा. पोलिसांनी त्याच्याकडून अशा प्रकारच्या ५ तरुणांच्या किट जप्त केल्या.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक कदिर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी अंमलदार योगेश तळवंदे, सुशांत शेळके, नितीन देशमुख, अमोल सोनटक्के, धनंजय सानप, गोकुळ कुत्तरवाडे, संदीप पाटील, राम काकडे, अल्ताफ पठाण, विजय काळवने, सोनाली भदाणे, क्षतिजा कीर्तन यांनी केली.

या बँक खात्याविरुद्ध देशभरात ६५ तक्रारी

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली उच्चशिक्षित आणि सामान्य नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. या गंभीर गुन्ह्यांमध्ये लोकांचे लुटलेले पैसे थेट तलरेजा याच्याकडे असलेल्या बँक खात्यांमध्ये वळते झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्याच्याशी संबंधित बँक खात्यांमध्ये होत असलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद उलाढालीमुळे यापूर्वी एटीएसने त्याला दोन वेळा ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सायबर गुन्ह्यांशी संबंधित या बँक खात्यांसंदर्भात देशभरातून तब्बल ६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

चेक, कारही जप्त

पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह सहायक निरीक्षक कदिर देशमुख यांच्या पथकाने तलरेजा याच्या घराची शुक्रवारी झडती घेतली. यात काही बँक खात्यांचे पासबुक, चेकबुक, ३ ते ४ मोबाईल्स सापडले आहे. गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

विद्यार्थ्यांना बँकेत नेऊन काढले पैस

तलरेजाने स्वतः सीसीटीव्हीत येऊ नये याची काळजी घेतली. सायबर फसवणुकीची रक्कम बँक खात्यांमध्ये येताच संबंधित विद्यार्थ्याला बँकेत घेऊन चेकद्वारे अनेकवेळा रकमा काढण्यात आल्या. त्याबदल्यात त्या विद्यार्थ्याला काही रक्कम त्याने देऊ केली. पैशासाठी तरुणही त्याच्या आमिषाला बळी पडले. तलरेजाकडे ८ बँक खाती आढळून आली. त्यात सायबर फसवणुकीचे १ कोटी ३६ लाखांचे गेल्या वर्षभरात व्यवहार झाले. पैसे येताच ते त्याने काढून घेतले आहे. मात्र ही रक्कम त्याने पुढे कोणाला दिली? बँक खात्यांची माहिती कोणाला दिली? सायबर फसवणूक करण्यात याचा काय रोल आहे? याबाबत तपास सुरू आहे.

पाकिस्तानातून भारतात स्थायिक, बारावी उत्तीर्ण

पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर भामट्यांच्या टोळीत सक्रिय आरोपी तलरेजा याचे कुटुंबीय सुमारे २५ वर्षांपूर्वी भारतात स्थायिक झाले. लक्ष याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. त्याचे कुटुंबीय शहरातच व्यवसाय करतात. लक्ष केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली ओढायचा जाळ्यात

विद्यार्थी, बेरोजगार, झोपडपट्टी भागातील तरुणांना शिष्यवृती, कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बँकेत नेऊन खाती उघडली जायची. त्यासाठी तलरेजाने किशन मिमरोड नावाचा व्यक्ती हाताशी धरला होता. बँक खात्याची किट, सिमकार्ड स्वतः कडे ठेवायचा. त्यावर सायबर फसवणुकीच्या रकमा घेऊन रोखीने काढायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT