Dhyas Ghazal Literary Group presents a poetry gathering on the terrace.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गोस्या पोरींच्या नशिबीही काळपट नवरे आले, जोड्या विजोड होत्या पण घटस्फोट नाही झाले. कवी प्रा. विजय पोहनेरकर याने या विनोदी कवितेच्या माध्यमातून टेरेस-वरील कवितांची मैफलीतील वातावरण हलके फुलके करत सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.
ध्यास गझल साहित्य समूह आयोजित टेरेसवरील कवितांची मैफल सातारा परिसरात कवी हनुमंत सोनवणे यांच्या घरी रंगली. कवी गिरीश जोशी यांच्या संकल्पनेवर आधारित या मैफलीत विविध विषयांना हात घालणाऱ्या कविता, गझला, अभंग, कवींनी सादर करून श्रोत्यांना काव्यसंतुष्ट केले. गझलकार गिरीश जोशी यांनी भांडून घेतले ना मागून घेतले, जे चार घास उरले वाटून घेतले, व्हीआयपीच दिसले देवासभोवती, दर्शन म्हणून आम्ही लांबून घेतले, आला कुणी न माळी रक्षण करावया मग शेवटी फुलांनी जाळून घेतले... या गझलेने वातावरणात चांगलेच रंग भरले.
मैफलीची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. माजी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी अतिथीपद तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद महेश खरात यांनी भूषविले. संतोष देशमुख, चंद्रकांत पांडे, दत्तात्रय मोरे, नारायण पुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अनेक गझलाकार, कवींनी आपल्या एकसे एक सरस कवीता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
हनुमंत सोनवणे यांनी नुसते बघण्यासाठी मजला किती जवळून गेलीस तू, अन् जरासा स्पर्श झाला किती लाजून गेलीस तू ही कविता सादर करून मैफलीत प्रेम रंगाची उधळण केली. डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कवितेने मैफलीची सांगता झाली. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले.