आन्वा ः धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी 21 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर “चला मुंबई, चला मुंबई” या निर्धार घोषणेसह धनगर समाजाचे नेतृत्व करणारे धनगर योद्धा दीपक बोर्हाडे यांनी भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे भेट देऊन समाजबांधवांमध्ये जनजागृती केली.
यावेळी बोलताना दीपक बोर्हाडेे यांनी सांगितले की, 17 जानेवारी रोजी जालना येथून मुंबईकडे कूच करण्यासाठी जवळपास दोन हजार गाड्या धनगर समाज बांधवांसह रवाना होणार असून, हा ताफा मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत किमान वीस हजार गाड्यांपर्यंत वाढेल. तसेच या आंदोलनात जवळपास तीन कोटी धनगर समाजबांधव सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“जोपर्यंत धनगर समाजाला एस.टी. प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदान सोडणार नाही,” असा ठाम इशारा यावेळी दीपक बोर्हाडेे यांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आव्हाना येथील खंडोबा महाराज संस्थान मंदिरात दीपक बोर्हाडे यांच्या हस्ते श्री खंडोबा महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
असा प्रवास
या कूचदरम्यान 17 जानेवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गावी मुक्काम करण्यात येणार असून, त्यानंतर पंढरपूर, फलटण, जेजुरी व पुणे मार्गे मुंबई असा प्रवास राहणार आहे. विविध ठिकाणी मुक्काम करून समाजबांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.