Devotee from Vadgaon dies in landslide at Kedarnath
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा
केदारनाथ यात्रेला गेलेल्या वडगाव येथील ३८ वर्षीय भाविकाच्या अंगावर दरड को-सळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. परमेश्वर भीमराव खवल (३८, रा. परतूर, जि. जालना ह.मु. साईबन हौसिंग सोसायटी, वडगाव को.) असे या घटनेत मृत्यू पावलेल्या भाविकाचे नाव असून, ते व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होते.
प्राप्त माहिती अशी की, मृत परमेश्वर भीमराव खवल यांनी काही दिवसांपूर्वी बजाजनगरातील तारांगण हौसिंग सोसायटीमध्ये घर किरायाने घेऊन ते कुटुंबासह तिकडे राहायला गेले होते. केदारनाथ येथे आई वडिलांना नेण्याची परमेश्वर यांची इच्छा होती. मात्र वयोमानामुळे त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिल्याने परमेश्वर हे एकटेच केदारनाथला गेले होते.
गौरीकुंड येथून पायी प्रवास करत असताना अचानक डोंगराची दरड कोसळल्याने या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. तेथील यंत्रणेने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याची माहिती तेथील पोलिस अधिकारी अर्जुनसिंग यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिली. यावरून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तात्काळ परमेश्वर यांचे घर गाठले, तेव्हा घरात त्यांचे वृद्ध आई-वडील दोघेच होते. दोन्ही मुली शाळेत तर त्यांच्या पत्नी लहान मुलाला सोबत घेऊन रक्षाबंधनासाठी माहेरी गेल्या होत्या.
दरम्यान पोलिसांनी मृत परमेश्वर यांचा भाऊ पांडुरंग यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिल्यानंतर ते विमानाने केदारनाथकडे रवाना झाले असल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले. परमेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.