Devgaon Rangari-Deowlana road riddled with potholes; motorists in distress
देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी ते देवळाणा या अवघ्या सहा किलोमीटरच्या रस्त्याने आज अक्षरशः मृत्यूचा महामार्ग अशी ओळख मिळवली आहे. विकासाच्या घोषणा, मंजुरीची आश्वासने आणि निधीच्या चर्चाच्या धुरळ्यात हा रस्ता मात्र पूर्णपणे खड्ड्यात गाडला गेला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा ठरत आहे.
एकेकाळी परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा दुवा असलेला हा रस्ता आज वाहनचालकांसाठी जीवघेणा बनला आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले असून ठिकठिकाणी खोल आणि धोकादायक खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडा खचल्या असून वाहन घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होत आहेत. अनेक वाहनांचे सस्पेन्शन व इतर यांत्रिक बिघाड होणे ही आता रोजचीच बाब झाली आहे.
विशेष म्हणजे, अनेकदा ग्रामस्थांना आश्वासन मिळाले आहे परंतु प्रत्यक्षात एकही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही आणि कामाचा एकही टप्पा सुरू झालेला नाही. त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातत्याने अधिकाऱ्यांकडूनही टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
"प्रस्ताव पाठवला आहे", "निधी मंजुरीच्या प्रक्रियेत आहे", "लवकरच काम सुरू होईल" अशी ठराविक आणि साचेबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रत्यक्षात कामासाठी कोणते वेळापत्रक निश्चित करण्यात आले, किती निधीची तरतूद झाली, प्रस्ताव कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या चार ते पाच दशकांपासून या रस्त्याच्या नावावर केवळ प्रस्ताव, मंजुरीच्या चर्चा आणि निवडणुकांपूर्वीच्या घोषणा होत आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत गेली आहे. त्यामुळे "रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी नेमका कुठे गेला?", "काम का झाले नाही?" आणि "या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण?" असे थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
शेतीमाल बाजारात नेण्यास अडचण
या रस्त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा विलंब होत असून वाहतूक खर्च वाढला आहे. वाहनांच्या वारंवार होणाऱ्या दुरुस्तीमुळे आर्थिक भार वाढत आहे. विद्यार्थ्यांना दररोज शाळा आणि महाविद्यालयात जाताना जीव धोक्यात घालावा लागत असून रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही वेळेत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. अनेकवेळा निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेतलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.