देवगडला कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाळी file photo
छत्रपती संभाजीनगर

Tripurari Purnima : देवगडला कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाळी

कार्तिक स्वामींसह भगवान दत्तात्रयांचे दर्शन; त्रिपुरारी वाती, दीपदानाने प्रवरातीर उजळला

पुढारी वृत्तसेवा

Devgad sees a large gathering of devotees on the occasion of Kartik Purnima

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : कार्तिक तसेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि. २४) श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रय, कार्तिक स्वामी आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीन देवगडनगरी दुमदुमून गेली. 'दत्तात्रय', 'श्री समर्थ सगुरू किसनगिरी बाबा' आणि 'कार्तिक स्वामी' यांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांचा अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता जयघोष व घंटानादात महाआरती झाली.

कार्तिक स्वामींचे दक्षिण भारतात मोठे महत्त्व असून वर्षातून एकदा महिला भाविक त्यांच्या दर्शनासाठी जातात. देवगड येथेही कार्तिक स्वार्मीचे मंदिर असल्याने यंदा महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली. कार्तिक स्वामी हे भगवान शंकराचे पुत्र व भगवान गणेशाचे बंधू असून त्यांच्या उपासनेतून साहस, शक्ती, युक्ती व बुद्धीची प्राप्ती होते. कुटुंबात सुख-समाधान नांदावे, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि देशात राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत होऊन बलशाली भारत निर्माण व्हावा, अशी प्रार्थना महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केली.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी त्रिपुरारी वाती प्रज्वलित करून विधिवत पूजन केले. भाविकांनी देवगड घाटावर गंगास्नान करून प्रवरामाईला दीप अर्पण केले. कार्तिक स्वामींना प्रिय मानले जाणारे मोरपीसही भाविकांनी अर्पण केले. मंदिर परिसरात विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आल्याने उत्सवाला यात्रेचे स्वरूप आले. कनकोरी, गळनिंब व जामगाव येथील ग्रामस्थ भक्त मंडळांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. नेवरगाव येथील भजनी मंडळाने जागर सादर केला. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT