Deputy Chief Minister Eknath Shinde criticism on Uddhav Thackeray
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी होती, तेव्हा मदत केली नाही. आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. कितीवेळा हंबरडा फोडणार. आम्ही उठाव केला तेव्हा हंबरडा फोडला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हंबरडा फोडला. आता मुंबई महानगरपालिका हातची गेल्यावरही हंबरडा फोडायचा आहे. त्यामुळे थोडी शक्ती शिल्लक ठेवा, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.१०) उद्धव ठाकरे यांना लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे, संजना जाधव, विलास भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरतसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी स्वतः बांधावर जाऊन आलो. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बांधावर जाऊन आले. दसरा मेळाव्यावेळीच मी म्हटलो होतो, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्यानुसार आमच्या महायुती सरकारने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. आता काही जण शेतकऱ्यांच्या नावाने हंबरडा मोर्चा काढत आहेत.
मुख्यमंत्री असताना त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी होती, पण त्यांनी केली नाही. आता उगाच शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवत आहेत आणि हंबरडा किती वेळा फोडणार. आधी सर्व काही गेले म्हणून हंबरडा फोडला, आता मुंबई महापालिका निवडणूक व्हायची आहे. मुंबई हातची गेल्यानंतर पुन्हा हंबरडा फोडायचा आहे, त्यामुळे थोडी शक्ती शिल्लक ठेवा, असे शिंदे म्हणाले.
इंग्लंडचे पंतप्रधान नुकतेच मुंबईत येऊन गेले, मी त्यांना भेटलो. आमचे काही लोक तुमच्याकडे सतत येतात, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे मी त्यांना म्हणालो. उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही नाही. सर्व काही लंडनमध्ये जमा केल्यावर काय होणार ? पण आमचे तसे नाही. एकनाथ शिंदेचे दोन्ही हात भरलेले आहेत. आम्ही सतत मदत करत असतो, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.