छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पोलिसांना न सापडलेला ३०-३० घोटाळ्यातील आरोपी ठेवीदारांनीच पकडला

पैसे बुडाले, आरोपी पकडून दिला पण ठेवीदारही अपहरणाच्या गुन्ह्यात अडकले

पुढारी वृत्तसेवा

Depositors themselves caught the accused in the '30-30' scam whom the police had failed to locate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गाजलेल्या बहुचर्चित ५०० कोटींच्या '३०-३०' महाघोटाळ्यातील गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या नितीन कल्याण चव्हाण (३२, रा. नरसिंह तांडा, बिडकीन) याचे चक्क फसवणूक झालेल्या ठेवीदारांनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अपहरण करून पकडल्याची घटना समोर आली आहे. या ठेवीदारांनी नितीनला आर्थिक गुन्हे शाखेच्या (इओडब्ल्यू) हवाली केले खरे, मात्र त्याच्या पत्नीने सिटी चौक पोलिसांत तक्रार दिल्याने हे अपहरणकर्ते ठेवीदारच आता गुन्ह्यात अडकले आहेत.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दुसरीकडे घोटाळेबाज नितीन चव्हाण याला आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

विशेष म्हणजे, ३०-३० घोटाळ्यातील आरोपी नितीन चव्हाण हा आर्थिक गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. मात्र, तो भूमिगत न होता प्रत्यक्षात शहरातच उजळमाथ्याने आणि मोकाट फिरत असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. पोलिसांची सर्व अद्ययावत यंत्रणा हाताशी असताना जो आरोपी त्यांना दोन वर्षे सापडला नाही, तो सामान्य ठेवीदारांनी शहरातूनच पकडून दिल्याने पोलिसांच्या तपासावर आणि कार्यक्षमतेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

घोटाळ्यातील फरार आरोपी नितीन चव्हाण हा बुधवारी (दि. १६) दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान महसूल विभागातील कामासाठी दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. याची कुणकुण ठेवीदारांना लागली. दीपक बाबु चव्हाण, जयलाल बाबु चव्हाण, अजय दिपक चव्हाण (तिघे रा. जटवाडा) आणि एका अनोळखीने त्याला कारमध्ये (एमएच-२०-एचएन-९०६८) बळजबरीने बसवून पळवून नेले. या अपहरणाची माहिती आलासिंग चव्हाण याच्याकडून नितीनचा भाऊ सतीशला मिळाली.

त्याने तात्काळ नितीनची पत्नीला कळवले. रात्रीच सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, अपहरणकर्त्या चौघांनी नितीनला रात्रभर स्वतःकडे ठेवून गुरुवारी (दि. १७) सकाळी थेट आर्थिक गुन्हे शाखेत आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या हाती नितीन आरोपी लागला असला तरी, पत्नीच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने सिटी चौक पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघा ठेवीदारांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

पैठण तालुक्यातील बिडकीन आणि शेंद्रा परिसरात २०१५ मध्ये डीएमआयसी प्रकल्प आला. यात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन राठोड याने ३०-३० स्कीम काढली. दरमहा ७ टक्के परतावा आणि दामदुपटीचे आमिष दाखवून त्याने कोट्यवधींचा गंडा घातला. २०२१ मध्ये परतावा मिळणे बंद झाल्यावर २०२२ मध्ये त्याला अटक झाली.

तेव्हा ५०० कोटींची उलाढाल उघड झाली, मात्र ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला एमपीआयडी कायदा न लावल्याने आणि साक्षीदार फितूर झाल्याने तो सुटून पसार झाला. अखेर ६० ठेवीदारांनी २०२४ मध्ये उस्मानपुरा पोलिसांत पुन्हा गुन्हा दाखल केला आणि ईओडब्ल्यूने तपास हाती घेत एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली.

या घोटाळ्यात शहर पोलिसांनी १४ पैकी ५ आरोपींना (सुहास चव्हाण, कृष्णा राठोड, साहेबराव राठोड, आलासिंग राठोड, पंकज जाधव) अटक केली होती. तर मुख्य सूत्रधार संतोष राठोडसह अमोल कृष्णा चव्हाण, पंकज शेषराव जाधव, अशोक दिपचंद चव्हाण, नितीन कल्याण चव्हाण, पंकज नामदेव राठोड, स्वाती नरेंद्र पवार, रणजीत गेमा राठोड, पवन केशव राठोड हे ९ आरोपी फरार होते. त्यापैकी नितीन चव्हाणला आता ठेवीदारांनीच पकडून दिले.

आरोपीच्या खात्यात दीड कोटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्यातील तब्बल दीड कोटी रुपये आरोपी नितीन चव्हाण याच्या खात्यावर वळते करण्यात आले होते. त्यामुळे त्याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. दुसरीकडे, या प्रकरणातील अपहरणकर्ता जयलाल आणि त्याच्या नातेवाईकांचे सुमारे ५० लाख रुपये या घोटाळ्यात बुडाले आहेत. आपले कष्टाचे पैसे हडपणारा नितीन शहरात मोकाट फिरत आहे आणि पोलिस त्याला अटक करत नाहीत, या संतापातूनच ठेवीदारांनी स्वतःच कायदा हातात घेत त्याचे अपहरण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT