Departure of Shri Sant Eknath Maharaj Paduka Palkhi Ceremony
चंद्रकांत अंबिलवादे
भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी
पैठण : राज्याच्या संत परंपरेत मानाचे स्थान असलेल्या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पादुका पायी पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी बुधवारी (दि. १९) पैठणनगरीच्या पालखी प्रस्थान ओट्यावरून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. भानुदास एकनाथ, असा जयघोष करीत हजारो वारकरी भाविक भक्त सूर्यास्ताच्या वेळेत येथून लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले.
नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सोहळा प्रथम मुक्कामासाठी चनकवाडी येथे मार्गस्थ झाला आमदार विलासबापू भुमरे, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, न.प मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, तहसीलदार दिनेश झांपले, थेट वारीतून नायब तहसीलदार विष्णू घुगे यांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले.
दुपारी पालखी ओट्यावर नाथांच्या पादुकांचे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पादुकांचे विधिवत पूजन करून पालखी चांदीच्या रथात पादुका ठेवून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. याप्रसंगी नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, ज्ञानेश महाराज पालखीवाले, योगेश महाराज पालखीवाले, रखमाजी महाराज नवले, गंगाराम महाराज राऊत, महालिंग महाराज, भानुदास महाराज,रवींद्र महाराज पांडव, सचिन महाराज पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी, रेखाताई कुलकर्णी, नाथसंस्थानचे विश्वस्त दादा बारे, गजानन झोल, महेश खोचे, कैलास बोबडे, पांडुरंग निरखे, गणपत माने, व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, बलराम लोळगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी आषाढीनिमित्त श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान होते. यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. हजारो वारकरी हातात भगवा पताका घेत टाळ-मृदंगांच्या गजरात मभानुदास एकनाथफ च्या जयघोषात, अभंग व भजनात तल्लीन होऊन पायी दिंडीत सहभागी झाले होते. सोहळ्याचा दुसरा मुक्काम गुरुवारी (दि.१९) हातगाव (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) येथील पंचक्रोशीत होणार आहे.