Demand for extension of deadline for MPSC Group B Combined Preliminary Examination application
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा २०२५ साठी आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (अराजपत्रित) ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट आहे. मात्र राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थी असोसिएशनने आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक भागात प्रचंड पाऊस झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच इंटरनेट नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत आहेत.
सलग शासकीय सुट्यांमुळे सर्व कार्यालये बंद असल्याने अनेकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत. या सर्व अडचणींचा विचार करून आयोगाने किमान पुढील आठ दिवस तरी ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.