

Youth ends life by exploding cylinder
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
कॉलेजमधून चुलत्याच्या घरी आलेल्या २० वर्षीय तरुणाने घराचे दार बंद करत सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न मृत ओम राठोड केला. मात्र तो फसल्याने त्याने किचन मधील सिलिंडरचे रेग्युलेटर काढून त्यात कात्री खोचून गॅस लीक केला. गॅस लीक होताच आग लावल्याने सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीरीत्या भाजलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२०) दुपारी साडेचारच्या सुमारास जवाहरनगर भागातील न्यू शांतीनिकेतन कॉलनीत घडली.
ओम संजय राठोड (२०, रा. बंबाटनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सरस्वती भुवन महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत सीएची तयारीही करत होता. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमचे चुलते सुभाष राठोड हे न्यू शांतिनिकेतन कॉलनीत राहतात. त्याला कॉलेजला जायला यायला सोपे पडत असल्याने तो अधिक वेळ चुलत्याच्याच घरी असायचा. त्याचे आई वडील बंबाटनगर भागात राहतात.
बुधवारी त्याची आई, मामा व अन्य नातेवाइकांसोबत नाशिक येथे गेली. दुपारी बाराच्या सुमारास चार्जर घ्यायचे आहे, असे ओमने सांगितल्याने वडील त्याला चुलत्याच्या घरी घेऊन आले. तेथून त्याला आकाशवाणी चौकात सोडले. ओम तेथून कॉलेजला गेला. वडील बंबाटनगर येथे घरी परत गेले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओम कॉलेजहुन न्यू शांतिनिकेतन येथे चुलत्याच्या घरी आला होता. त्यावेळी त्याची चुलती घरात होती. तो त्यांच्याशी हसत-खेळत बोलला. त्यानंतर त्याची चुलती शाळेतून मुलाला घेण्यासाठी बाहेर गेली.
ओम हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. इयत्ता बारावीमध्ये त्याला ९४ टक्के गुण मिळाले होते. त्याचे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनण्याचे स्वप्न होते. सीएच्या दोन परीक्षा तो उत्तीर्णी झाला होता. दुपारी वडिलांना जाताना त्याने कॉलेजमधून नवीन आयकार्ड बनून आणायचे असल्याचेही सांगितले होते. घटनेनंतर हॉलमधील पलंगावर त्याच्या बॅगमध्ये नवीन आयकार्डही होते. ओमने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. अधिक तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.
घराचे सर्व खिडक्या दरवाजे बंद होते. सिलिंडर लीक करून गॅस घरात पूर्णपणे भरल्यानंतर आग लावली असावी. स्फोट झाल्याने किचनमध्ये ओम गंभीररीत्या भाजून पडलेला होता. पोलिसांच्या पाहणीत एका खोलीत पंख्याला साडी लटकलेली होती. त्यावरून ओमने अगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केला असावा तो फसल्याने त्याने सिलिंडरचा स्फोट करून आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांना आहे. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी ही आत्महत्याच असून, घटनास्थळावरून स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
दार वाजविले अन् काही क्षणात स्फोट ओमची चुलती मुलाला शाळेतून घेऊन घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा बराच वेळ त्यांनी वाजविला. मात्र ओम दार उघडत नसल्याने त्यांनी बाजूला राहणारे पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांच्या घराकडे घावरून धाव घेतली अन् तेवढ्यात घरातून स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. धुराचे लोळ खिडकीतून बाहेर येऊ लागले. आवाजाने आजूबाजूचे लोक आणि बाजूच्या बांधकामावरून मजूर धावले. घराचा दरवाजा तोडला. तेव्हा आतून आगीचे लोळ, धुराचे लोट बाहेर पडू लागले. नागरिकांनी पाणी मारून आग विद्याविण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस लीक असल्याने नागरिक घाबरले होते. स्फोटाने घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. त्यानंतर उस्मानपुरा विभागाचे एसीपी रणजित पाटील हेही घटनास्थळी आले. उपअग्रिशमन अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर, ड्यूटी इंचार्ज चेतन तरोळे, जवान अशोक वेलदोडे, राजू ताठे, अमिर शेख, योगेश दुधे, किशोर कोळी यांनी धाव आग आटोक्यात आणली. सिलिंडर बाहेर आणून विझवले. पोलिसांनी ओमचा मृतदेह घाटीत रवाना केला.