पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी हतबल pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Agriculture News : पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी हतबल

रोहिणी-मृग नक्षत्र कोरडे; पेरण्या खोळंबल्याने चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

पाचोड : यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने पाचोडसह परिसरातील खरीप हंगाम संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

रोहिणी आणि मृग नक्षत्रातील बहुतांश दिवस कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. काही शेतकऱ्यांनी तूर व कापसाची धुळपेरणी केली असली तरी पावसाअभावी उगवण होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. दररोज पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढत असून मृग नक्षत्राच्या उर्वरित कालावधीत तरी दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे व खते आणि त्यात पावसाचा विलंब यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पावसाअभावी उकाड्यात वाढ झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत आहे. अनेक विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी घटल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतीसाठी कर्ज काढलं, बायकोचे दागिने गहाण ठेवले, महागडी खते-बी-बियाणे घेतले. आता आभाळानेच पाठ फिरवली आहे. कोरड्या जमिनीकडे पाहताना काळजाचा तुकडा तुकडा होतोय. पाऊस नाही पडला तर फक्त पीकच नाही, तर शेतकऱ्याची स्वप्न आणि संसारही उध्दवस्त होईल.
कृष्णा जाधव, शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT