Declare Mantha Taluka as drought-affected
मंठा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात यावर्षी वरून राजाची आवकृपा झाल्याने खरिपाची संपूर्ण पिके पाण्या अभावी जळून गेली आहेत. मंठा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले की, सुरवातीला पेरणीलायक पाऊस झाला व त्यावर खरिप पेरणी झाली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडिद, हळद, ऊस इत्यादी खरीपाची पिके पाण्याअभावी बहरात येऊन जळून गेली असल्याने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणाने हिरावला गेला आहे.
मागील दोन महिण्यापासून पाऊस नसल्यामुळे खरिपामधील उभी पिके जळून गेली असल्याने तालुक्यातील संपूर्ण शतेकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुक्या जणावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात सर्वत्र आज रोजी चैत्र, वैशाख महिन्या प्रमाणे उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंठा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी किसान ब्रिगेड तालुकाध्यक्ष विजयकुमार देशमुख व शेतकरी पदाधिकारीच्या वतीने यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनावर विजयकुमार देशमुख सह उत्तम गणपत राठोड, प्रल्हाद सखाराम रागडे, गजानन घुगे, उत्तम नारायण घुगे, शिवकुमार देशमुख, संजय श्रीराम चव्हाण, प्रल्हाद फुफाटे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी सह्या केलेले आहेत.