Date-Patil remains firm on the hunger strike even on the fifteenth day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषणाला बसलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते-पाटील रविवारी (दि. २३) पंधराव्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले. सलग पंधरा दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली असून, खत्तातील साखरेची पातळी घसरली आहे. स्वत्तदाबातही चढ-उतार होत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी दाते-पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. त्यामुळे आंदोलनस्थळी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दाते-पाटील यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलनस्थळी न आल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. दाते-पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दाते-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. शिवानंद भानुसे, लक्ष्मणबापू शिरसाठ, योगेश शेळके, सुनील कोटकर, विजय काकडे, निखिल काकडे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. दाते-पाटील यांच्या भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.