Grishneshwar Temple : घृष्णेश्वर मंदिरात आता कमी वेळात होणार दर्शन file photo
छत्रपती संभाजीनगर

Grishneshwar Temple : घृष्णेश्वर मंदिरात आता कमी वेळात होणार दर्शन

वेरूळ विकास आराखडा : लवकरच पूर्ण होणार पहिला टप्पा

पुढारी वृत्तसेवा

Darshan at Grishneshwar Temple will now take less time

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम येत्या जानेवारी अखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून अंडरपासमुळे भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांचे कमी वेळेत दर्शन होईल, अशी माहिती बुधवारी वेरूळ विकास आराखड्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी पत्रकारांना दिली.

कुंभमेळ्यापूर्वी वेरूळ विकास आराखड्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी गौडा जीसी हे कामाचा आढावा घेत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी वेरुळला भेट देत कामाची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी कामाचा आढावा घेतला.

त्याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, येत्या जानेवारी अखेरपर्यंत वेरूळ विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे एक बाजू दर्शनासाठी सुरू करता येणार आहे. यात अंडरपासचे काम पूर्ण होणार असल्याने भाविकांना दर्शनासाठी ताटकळत बसावे लागणार नाही. कमी वेळेत दर्शन घेता येणार आहे.

दरम्यान, महाशिवरात्रीला यंदा भाविकांना दर्शनासाठी उशीर लागणार नसल्याचे संकेतही जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी दिले आहेत. ते म्हणाले मंदिर परिसरातील सर्व दुकाने पार्किंग परिसरात स्थलांतरित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी दुकाने उभारण्यात येणार आहेत. या व्यावसायिकांना दुकाने भाडेतत्त्वावर दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिक्रमणांवर दोन दिवसांत हातोडा

घृष्णेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने पादचारी मार्ग होणार आहे. त्यासाठी या परिसरातील सर्व अतिक्रमणांवर येत्या दोन दिवसांत हातोडा पडणार आहे. तसे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT