Daring theft at Samarth Ram temple on the day of Hanuman Jayanti
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुन्हेगारांना आता पोलिसांचा कवडीमात्र धाक उरलेला नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चोरट्यांची मजल आता थेट देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. समर्थनगर भागातील प्रसिद्ध श्री समर्थ राम मंदिरात हनुमान जयंतीच्या दिवशीच (दि.२) पहाटेच्या सुमारास चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे ४५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि श्री राम प्रभुंच्या पितळी पादुका असा एकूण ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नुकताच रामनवमी उत्सव पार पडल्याने भाविकांनी भरभरून दानपेटीत रक्कम टाकली होती. येत्या एक दोन दिवसांत मंदिर समिती या दानपेटी उघडणार होते. त्यापूर्वीच चोरट्याने डल्ला मारल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
फिर्यादी उदय विजयराव कुलकर्णी (४७, रा. समर्थ राम मंदिर) हे या मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. गुरुवारी (दि. २) हनुमान जयंती असल्याने ते नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच पहाटे ४.५० वाजेच्या सुमारास मंदिरात पूजेसाठी आले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूच्या जिन्याजवळील लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी तातडीने मंदिर परिसरातच राहणारे विवेक कुलकर्णी (पुज ारी) तसेच श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मयुरेश कोटणीस, प्रभाकर कुलकर्णी, अध्यक्ष माणिक रत्नपारखी आणि सचिन जोशी यांना बोलावून घेतले. विश्वस्तांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, मुख्य मंदिरातील चॅनेल गेट आणि गाभाऱ्याच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला आढळला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक निशिगंधा मस्के करत आहेत.
तीन महिन्यांत चार मंदिरांत चोरी
शहरातील देवस्थानांना चोरट्यानी टार्गेट केले आहे. गेल्या तीन महिन्यांतील चोरीची पाचवी घटना आहे. यापूर्वी पदमपुरा, मुकुंदवाडी, हर्मूल भागातील शिवदत्तात्रय मंदिरांच्या दानपेटी फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केली होती.
भाविकांच्या श्रद्धेवरच घाला !
नुकत्याच झालेल्या रामनवमी उत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवाला दान दिले होते. याच रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. चॅनल गेटच्या वरच्या बाजूने आत उडी मारली आणि टामीने कोयंडा तोडून अवघ्या १५ ते २० मिनिटांत चोरीचे काम फत्ते केले. मुख्य गाभाऱ्यासमोरील मोठ्या दानपेटीतील अंदाजे ४० हजार रुपये आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेसमोरील छोट्या दानपेटीतील ५ हजार रुपये असा ४५ हजारांचा रोख ऐवज चोरला. तसेच मुख्य गाभाऱ्याला लोखंडी आणि लाकडी अशी दोन दरवाजे आहेत. दोन्हीचे कुलूप तोडून चोरटा थेट मुख्य गाभाऱ्यात श्री राम प्रभुंच्या मूर्तीसमोर गेला. तेथून लहान पितळी पादुकाही त्याने चोरून नेल्या.