स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही धोकादायक टाकी कायम file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही धोकादायक टाकी कायम

जि. प. सर्वसाधारण सभेत सदस्यांचा प्रशासनावर संताप

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या ठरावांची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नसेल तर अशा ठरावांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल मंगळवारी (दि.३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केला.

कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथील धोकादायक पाण्याची टाकी पाडण्याचा २०२२ मध्ये ठराव झाला, त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट अहवालही सादर झाला. मात्र दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही टाकी अद्याप उभीच असल्याचे समोर आले. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारती पाडण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना शिवसेना उबाठाचे जिल्हा परिषद सदस्य केतन काजे यांनी भारंबा तांड्यावरील पाण्याच्या टाकीचा मुद्दा उपस्थित केला.

२०२२ मध्ये सर्वसाधारण सभेने टाकी पाडण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार एप्रिल २०२४ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट अहवालही सादर करण्यात आला. तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बिडकीन येथील जीर्ण अंगणवाडी इमारत पाडण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते मनोज पेरे यांनी केली.

सावखेड गंगा, वीरगाव व बाबतारा येथील धोकादायक शाळा खोल्या पाडण्याची मागणी पंकज ठोंबरे यांनी केली. पिंपळगाव गांगदेव येथील शाळा जीर्ण झाल्याचे गीतांजली पाथरीकर यांनी निदर्शनास आणून दिले, तर भिवधानोरा येथील शाळेच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती दीपा मुंदडा यांनी सभागृहात दिली.

अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देण्याची मागणी मंगल तायडे यांनी केली. ठराव मंजूर करूनही त्याची वेळेत अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सदस्य मनोज गायके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयांची निश्चित मुदतीत अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT