Dangerous shortcut to the railway platform
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रेल्वे स्थानकात दिवाळीच्या सुट्टीनंतर परतीचा प्रवास सुरू झाल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत स्थानकात उसळलेली गर्दी पाहता अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म जवळ करण्यासाठी धोकादायक शॉर्टकट वापरत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. याकडे लोहमार्ग पोलिस कानाडोळा करत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी सरकता जिना, दादरा, लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासी या सुविधाचा वापर न करता थेट रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर ये-जा करत आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांसह अनेकजण लिफ्ट, फूटओव्हर ब्रिज किंवा सरकता जिना वापरण्याऐवजी धोकादायक रीतीने अंदाजे चार फूट उंच फलाटावर उडी मारताना पहायला मिळत आहे. रुळांच्या मधोमध उभे राहून रेल्वेत जागा पकडण्याचा प्रयत्न करणारे प्रवासीही अनेकदा दिसून येत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून सतत घोषणा होत असल्या तरी त्याचा परिणाम प्रवाशांवर होताना दिसत नाही. स्थानकात सर्व सुविधा असतानाही प्रवाशांत जनजागृतीचा अभाव दिसत आहे.
जलद रेल्वेसमोरही धाडस
विशेष म्हणजे तपोवन, सचखंड, नरसापूर एक्स्प्रेस यांसारख्या जलद गतीच्या गाड्यांच्या आगमनाच्या वेळीही असे धाडस प्रवासी करत आहेत.
कडक कारवाईचे अधिकार
रेल्वे कायद्यानुसार अशा प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. रूळ ओलांडणे, धोकादायक पद्धतीने प्रवास करणे किंवा रेल्वेची सुरक्षा धोक्यात आणणे या प्रकारांवर दंड तसेच तुरुंगवासाची तरतूद आहे. जीआरपी तसेच आरपीएफ यांना अशा प्रवाशांवर कारवाईचा अधिकार आहे, परंतु यांची डोळेझाक सुरू असल्याने अशा घटनांत वाढ होत आहे.