सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना लगेचच सुरुवात झाली. मात्र औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अजूनही जाहीर झालेले नाही. मराठवाड्यात डी. फार्मसीची तब्बल १४१ कॉलेज असून, यामध्ये एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता ही ८५२० इतकी आहे.
यंदा बारावीचा निकाल ५ मे आणि इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. दहावीचा निकाल लागताच पॉलिटेक्निक, आयटीआयसह इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली. बारावीच्या अनेक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवर सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे त्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही पुढे सरकली.
मात्र बारावीनंतरच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. डी. फार्मसी अभ्यासक्रमाला इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारे थेट प्रवेश दिले जातात. बारावीचा निकाल जाहीर होऊन आता ४३ दिवस उलटून गेले आहेत. परंतु थेट प्रवेशाची प्रक्रिया किंवा प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. तर काही विद्यार्थी इतर नाइलाजाने इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे.
सध्या राज्यात पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. डी. फार्मसीची प्रवेश प्रक्रिया मात्र सुरू होणे बाकी आहे. लवकरच त्याबाबत सूचना प्राप्त होतील. - डॉ. के. बी. लाढाणे, सहसंचालक तंत्रशिक्षण, कशामुळे रखडली प्रक्रिया ?
बारावीनंतर बी. फार्मसी आणि डी. फार्मसी हे दोन्ही अभ्यासक्रम करता येतात. यातील बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. तर डी. फार्मसीसाठी थेट प्रवेश दिले जातात. गतवर्षी आधी डी. फार्मसीला प्रवेश घेत-लेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नंतर बी. फार्मसीला प्रवेश घेतला.
त्यामुळे डी. फार्मसीच्या काही जागा रिक्त झाल्या. म्हणून यंदा डी. फार्मसी आणि बी. फार्मसीची प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे डी. फार्मसीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.