Cylinder explodes after fire breaks out due to lamp in house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तिसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत लावलेल्या दिव्याने पेट घेतल्याने घरात आगीचा भडका उडाला. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने खोलीत ठेवलेल्या दोन पैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला.
ही घटना हर्सल परिसरातील छत्रपतीनगर गल्ली क्रमांक २ येथे रविवारी (दि. २२) दुपारी १२:३० ते १:३० वाजेदरम्यान घडली. प्रसंगावधान राखत घरातील सदस्य तात्कळ बाहेर पळाल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. हसूल पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, किशोर राऊत यांचे तीन मजली घर आहे. छतावर त्यांनी एक पत्र्याची खोली बांधलेली आहे. त्या खोलीत आजी आजोबा राहतात. घरात लग्नकार्य असल्याने राऊत यांनी दोन सिलिंडर आणून त्याच खोलीत ठेवले होते.
दरम्यान, रविवारी आजोबाने खोलीत दिवा लावला होता. मात्र दिव्याने आग भडकून शॉर्टसर्किट झाले. आधी गादीला आग लागली. ही आग झपाट्याने पसरत गेली आणि त्यानंतर खोलीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हर्सल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी तात्काळ डायल ११२ चे अंमलदार दिनेश पुसे, राकेश देशमुख यांना सूचना दिल्या. अग्निशमनला कळविले.
त्यानंतर अर्ध्या तासात अग्निशमनने आग आटोक्यात आणली. घरातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आगीत घरातील फर्निचर, कपडे आणि इतर घरगुती साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.