Sambhajinagar heavy rainfall : आठ दिवसांत ५ लाख हेक्टरवरील पिके नष्ट  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar heavy rainfall : आठ दिवसांत ५ लाख हेक्टरवरील पिके नष्ट

बीड, धाराशिवसह सर्वच जिल्ह्यांत धुमाकूळ, १८२ मंडळांमध्ये अतिवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

Crops on 5 lakh hectares destroyed in eight days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात मागील आठवडाभरात पावसाने कहर केला आहे. मागील आठवडाभरात तब्बल १८२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून यामुळे ४ लाख ९१ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर जूनपासून आतापर्यंत पावसामुळे १८ लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात दमदार पाऊस होतो आहे. १५-१६ ऑगस्ट रोजी अनेक मंडळांत अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर मागील आठवड्यातही पुन्हा एकदा पावसाने मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मराठवाड्यात कुठे न कुठे अतिवृष्टीचा कहर सुरूच आहे. १३ ते २० सप्टेंबरदरम्यान तब्बल १८२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यात सर्वाधिक म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यातील ५० मंडळांत अतिवृष्टी झाली, धाराशिव जिल्ह्यातील २७ मंडळांत अतिवृष्टी झाली, यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४ मंडळांत, जालन्यातील २१, लातूरमधील १३, नांदेड जिल्ह्यातील १३, परभणीतील १८ तर हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळांत अतिवृष्टी झाली. यात अनेक मंडळांत एकाहून अधिकवेळा देखील अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, आठ दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनसह अन्य खरीप पिके पाण्यात गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले असून पिकांचा चिखल झाला आहे.

कुठे किती पिकांचे नुकसान

विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या आठ दिवसांत मराठवाड्यातील ४ लाख ९१ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ५११ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जालन्यातील ५ हजार १२२ हेक्टरवरील, परभणी जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरहून अधिक पिके बाधित झाले आहेत. हिंगोली ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील, नांदेड जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार हेक्टर, बीड जिल्ह्यातील ६ हजार ४७० हेक्टरवरील तर धाराशिव जिल्ह्यातील ६ हजार ८ ७५ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यात वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जूनपासून आतापर्यंत विभागातील १७ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू असतानाच पावसाचा कहरदेखील सुरू आहे.

आठवडाभरात सातजणांचा मृत्यू

मराठवाड्यात मागील आठ दिवसांत ७जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली व बीड जिल्ह्यांत प्रत्येकी दोघांचा तर जालन्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून जालन्यात एकजण जखमी झाला आहे. तर विभागात छोटी मोठी मिळून २७४ जनावरे दगावली आहेत. यात १४८ दुधाळ जनावरांचा समावेश आहे. तर २८० हून अधिक घरांची पडझड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT