Sambhajinagar News : अर्ज द्या-कर्ज घ्या अभियान : सहा दिवसांत ५९ कोटींचे पीक कर्ज वाटप File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अर्ज द्या-कर्ज घ्या अभियान : सहा दिवसांत ५९ कोटींचे पीक कर्ज वाटप

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा शेतकऱ्यांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

Crop loan of Rs 59 crores distributed in six days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात अर्ज द्या-कर्ज घ्या अभियान राबविण्यात येत आहे. गावोगावी कर्ज वाटपाची शिबिरे घेण्यात येत असून, याअंतर्गत गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात ६४०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी ३० लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (दि.९) स्वतः चित्तेगाव येथील शिबिराला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात नेहमीच असंख्य अडचणी येत असतात. म्हणून यंदा शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अर्ज द्या-कर्ज घ्या, असे अभियानही जिल्ह्यात सुरू केले आहे. दि.३ ते १५ जुलैदरम्यान हे अभियान जिल्ह्यातील ३७५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चित्तेगाव येथे आयोजित कर्ज मेळाव्यास उपस्थित होते. चित्ते पिंपळगाव सरपंच पांडुरंग सोनोने, चित्तेगाव सरपंच सरला गावंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, तहसिलदार कैलास वाघमारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, मंडळ अधिकारी ए. एल. सुरपाम, ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप, वंदना खेडकर, कृषी सहाय्यक मंजुषा काचोळे तसेच शेतकरी उपस्थित होते.

यंदा जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मागील आठवड्यापर्यंत त्यापैकी ६७० कोटी ५५ लक्ष रुपये इतके कर्ज ८६ हजार ६९७ शेतकऱ्यांना वाटप झाले होते. म्हणजेच ४२ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. आता अभियान सुरु केल्यापासून (दि. ३ जुलैपासून) आजतागायत ६४०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी ३० लक्ष रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या हंगामात एकूण आतापर्यंत ९३ हजार १०२ शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली. जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचे नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केले. या मेळाव्यात पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीचे पत्रही देण्यात आले.

शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा : जिल्हाधिकारी खरीप हंगाम आता ऐन मध्यावर आला आहे. आताच शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. तेव्हा बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बँक अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT