छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत अतोनात नुकसान झाले. ४ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली. तसेच ८२७ जनावरे आणि ३७ व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र महसूल विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू आहेत. आतापर्यंत केवळ ५० टक्केच नुकसानीचे पंचनामे झाल्याची माहिती समोर आली आहे.
विभागातील आठही जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. नांदेड, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेकडो गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली. भिंत कोसळून माणसे, जनावरेही दगावली. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले. महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार, १ जूनपासून आजपर्यंत मराठवाड्यात ४ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
आतापर्यंत यातील ५० टक्के म्ळणजे २ लाख ३५ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर पन्नास टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे अजूनही बाकी आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी लागणारी रक्कम निश्चित होईल, त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर - 5288
जालना - 19155
परभणी - 90062
हिंगोली - 1826
नांदेड - 340737
लातूर - 2316
धाराशिव - 1088
एकूण - 462642
विभागीय आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार पावसामुळे आतापर्यंत विभागात ८२७ जनावरे दगावली आहेत. यामध्ये दुधाळ, ओढकाम करणाऱ्या जनावरांचा समावेश आहे. तसेच ३७ माणसांचाही बळी गेला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १५ जणांचा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात ४, हिंगोली जिल्ह्यात ३, जालना जिल्ह्यात २ आणि धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मराठवाड्यात पावसामुळे सुमारे १८३२ घरांची पडझड झाली आहे.